आळस हा माणसाचा शत्रू आहे असे म्हणतात. एखादे काम केले नाही तर अनेकांना तुम्ही किती आळशी आहात असे म्हणताना ऐकले असेल. प्रत्येकाच्या घरात असा एकतरी आळशी धोंडा असतोच. मात्र अनेकांना जगातील सर्वात जास्त आळशी लोकं कोणत्या देशात आहेत असा प्रश्न पडतो. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका संशोधनात जगातील आळशी देशांबाबत भाष्य केले आहे. जगभरातील स्मार्टफोन धारकांच्या फोनवरील विशिष्ट डेटा गोळा करून शास्त्रज्ञांनी एका सर्वेक्षणाच्या आधाराने मोठा विचित्र शोध लावला आहे. या संशोधनात सर्वात आळशी देश आणि सर्वात सक्रीय देशांची नावे सांगितली आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांवर हे संशोधन केले आहे.
भारतीय लोक सध्या अनेक बाबतीत प्रगतिपथावर आहेत. प्रत्येक क्षेत्रात जगावर भारतीयांच्या बुद्धिमत्तेची छाप पडत आहे. परंतु तरीही भारताची म्हणावी तशी प्रगती होत नाही. प्रचंड लोकसंख्या हा देशावरचा बोजा ठरत आहे, प्रचंड मनुष्यबळ म्हणून त्याची गणती करणे अद्यापही भारताला शक्य झालेले नाही. भारत हा काही वर्षामध्येच सर्वाधिक तरुणांचा देश होणार असला तरी या तरुणांच्या ऊर्जेचा, क्रयशक्तीचा वापर योग्य प्रकारे करून घेतला जाणार का, याविषयीच्या प्रश्नचिन्हामुळे अद्याप आपण अमूक वर्षातच महासत्ता बनू असे भाकीत ठामपणे वर्तवू शकत नाही. यामागे आळस हे त्याचे प्रमुख कारण आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जारी ४६ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक ३९ व्या स्थानावर आहे. साधारणपणे एका निरोगी व्यक्तीने दिवसभरात सरासरी किमान १०,००० पावले चालणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अहवालानुसार, भारतातील लोक एका दिवसात सरासरी फक्त ४२९७ पावले चालतात. या संशोधनात असेही समोर आले आहे की, भारतीय पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिला दिवसभरात कमी चालतात. भारतीय पुरुष एका दिवसात ४६०६ पावले चालतात, तर भारतीय महिला एका दिवसात केवळ ३६८४ पावले चालतात. पूर्वीप्रमाणे कष्टाची कामे नाहीत, शिवाय चालणे-फिरणेही कमी असल्यामुळे भारतीय महिलांमध्ये गेल्या काही वर्षाच्या तुलनेत लठ्ठपणाचे प्रमाण २३२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. त्याउलट पुरुष अद्यापही ब-यापैकी चालत असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत शारीरिक हालचाली कमी झाल्या असल्या तरी त्यांच्यातील लठ्ठपणाचे प्रमाण ६७ टक्क्यांनी वाढले आहे. महिलांच्या तुलनेत ते इतर अनेक प्रकारांनी शारीरिकदृष्टय़ा अधिक कष्टाची कामे करतात किंवा सक्रिय असतात. या संदर्भात विविध आहारतज्ज्ञही चालण्याचे महत्त्व मान्य करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे. त्या महिला त्रासामुळे अधिक कमी चालतात. ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी जास्तीत जास्त चालावे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, भारतात हे चित्र उलट असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. जवळच्या ठिकाणी जायचे असले तरीही भारतीय लोक कारचा वापर करतात. तोंडाने ‘वॉकिंग डिस्टन्स’ असे म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते तिथपर्यंत चालत जात नाहीत, असे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे इंधनावर अकारण खर्च करणा-या देशांमध्येही भारतीय आघाडीवर असल्याचे हा निष्कर्ष सांगतो. आज भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारखे हुशार पंतप्रधान लाभले आहेत. त्यामुळे जगभरात भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डंका आहे हे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. मोदींच्या फिटनेसह त्यांच्याप्रमाणे फॅशन करणा-यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. नागरिकांनी फिट रहावे यासाठी ते नियमित योगा करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या याच सवयीमुळे त्यांना सर्वात क्रियाशील राजकारणी असे देखील संबोधले जाते. मात्र, सर्वात क्रियाशील पंतप्रधानांच्या देशातील नागरिक आळसावलेले असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
इंडोनेशिया हा देश निसर्ग सौंदर्याने नटलेला असला तरी जगातील सर्वात आळशी देश आहे. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार इंडोनेशियातील लोक दररोज सरासरी ३५१३ पावले चालतात. त्याचबरोबर या यादीत अमेरिकेचाही समावेश आहे. अमेरिकेतील लोक दररोज साधारण ४७७४ पावले चालतात. संशोधनानुसार हाँगकाँग हा जगातील सर्वात सक्रिय देश आहे. या देशातील लोक दररोज सरासरी ६८८० पावले चालतात. त्याच वेळी, चीन, युक्रेन, जपानमधील लोक देखील सरासरी ६००० पावले चालतात. गरीब देशातील लोक श्रीमंत देशांच्या तुलनेत अधिक सक्रीय असतात. रिपोर्टनुसार शारीरिक सक्रियता आजही अनेक देशात खूप गरजेची आहे. या संशोधनासाठी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने ४६ देशांतील ७ लाख लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये बसवलेल्या स्टेप काउंटरची मदत घेतली. आपण किती पावले चालतो हे पाहण्यासाठी ‘आर्गस‘ नावाचे अॅप वापरण्यात आले. ह्या अॅप च्या द्वारे आपली दिवसभरातील शारीरिक हालचाल किती होते आहे याची नोंद ठेवणे शक्य होते. या अॅप द्वारे शास्त्रज्ञांकडे ही माहिती उपलब्ध झाली. ही माहिती निरनिराळ्या देशांमधील लोकांशी निगडीत होती. ह्या माहितीच्या द्वारे काही गोष्टी शास्त्रज्ञांना अगदी प्रकर्षाने जाणाविल्या. शास्त्रज्ञांनी या माहितीच्या आधारे असे निदान काढले की जगभरामध्ये लोक सरासरी ४,९६१ पावले दररोज चालतात. अर्थात हा आकडा सर्व लोकांना लागू नव्हता. गावोगावी, देशो देशी ही संख्या वेगळी होती. लोक रहात असलेले प्रदेश, तिथली जीवनशैली, त्यांचा एकंदर फिटनेस या वर ही संख्या अवलंबून होती. हा अभ्यास मानवी विकासावर केलेल्या सर्व संशोधनांपेक्षा १००० पट मोठा आहे. बैठे काम आणि वाहनांचा अति वापर यामुळे श्रीमंत देशांमधील नागरिकांच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत. केवळ सकाळी तासभर फिरले की, शरीर आकारबद्ध राहते हा सुद्धा गैरसमज आहे. आरोग्य चांगले राहणे आणि शरीर सुदृढ राहणे यासाठी दिवसभर सक्रियता राखली गेली पाहिजे. दिवसाची झोप टाळून लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे या गोष्टी केल्यास वजनातील वाढही आटोक्यात राहते. म्हणूनच चिनी लोक भारतीय लोकांच्या तुलनेत सडपातळ आणि अधिक आरोग्यसंपन्न असतात.
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा