मुख्य सामग्रीवर वगळा

ज्येष्ठांनो बक्षीस पत्र करताना काळजी घ्या

मुलांच्या नावे संपत्ती करताना मुलांकडून म्हातारपणी काळजी घ्यावी अशी अट लिखित स्वरुपात लिहून घ्यावी, असं महत्वाच निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. अन्यथा मुलांनी त्यांच्या वृद्ध पालकांकडे दुर्लक्ष केल्यास पालकांनी केलेलं बक्षीस पत्र (गिफ्ट डिड) रद्द होऊ शकत नाही. न्यायमूर्ती संजय के. कौल आणि ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने मंगळवारी जेष्ठ नागरिकांना हा सल्ला दिला आहे. गुरुग्राममधील एका आईने तिच्या मुलांना काही मालमत्ता भेट दिल्या होत्या. त्यानंतर मुले तिची काळजी घेत नसल्याचा आरोप करून तिने नंतर बक्षीस पत्र रद्द करण्यासाठी मेंटेनन्स ट्रिब्युनलकडे धाव घेतली. न्यायाधिकरणाने आरोप खरे ठरल्यानंतर मे २०१८ मध्ये बक्षीस पत्र रद्द केले. पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने न्यायाधिकरणाच्या निर्णयाशी सहमती दर्शवली आहे. मात्र, न्यायमूर्ती कौल आणि ओका यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. बक्षीस पत्रामध्ये वृद्ध महिलेने तिची तीन मुले, दोन मुली आणि एक मुलगा यांना मालमत्ता भेट म्हणून देताना तिच्या देखभालीसाठी स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे बक्षीस पत्र रद्द करता येऊ शकणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

अनेकदा जेष्ठ नागरिकांना मुलं आजारपणात व वृद्धापकाळात त्यांची देखभाल करतील, अशी आशा असते. मुलांकडून त्यांना फार अपेक्षा असतात त्यामुळं मुलांच्या प्रेमापोटी ते स्व-कमाईतून कमावलेली मालमत्ता बक्षीस पत्राद्वारे विनाअट त्यांच्या नावे करतात. जेष्ठ नागरिक जेव्हा त्यांची मालमत्ता त्यांच्या जवळच्या लोकांना किंवा मुलांच्या नावे देतात तेव्हा त्याबदल्यात जेष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी, अशी अट त्यात जोडलेली नसते. बऱ्याचदा असे निर्णय प्रेम आणि आपुलकीच्या भावनेने घेतले जातात. त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा ठेवली जात नाही. वृद्धापकाळात मुलं  मात्र पालकांकडे  साफ दुर्लक्ष करतात. मुले मोठी झाल्यावर मालमत्ता स्वत:च्या नावावर करत आई-वडिलांना घरातून बाहेर काढतात, त्यांच्या औषधांसाठी किंवा खर्चासाठी पैसे न देणे, उपासमार होणे, मानसिक छळ होणे, त्यांना मारहाण करणे, अशा अनेक समस्यांना आजही देशातील तील ज्येष्ठ नागरिक तोंड देत आहेत. आई-बाप जन्मभराची पुंजी मुलांवर खर्ची घालतात. घरदार मुलांच्या नावे करतात... आणि मग एक टप्पा असा येतो, की त्या घरातल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे किंवा त्यातल्या एकाचे अस्तित्व मुलांना, सुनांना अगदी नातवंडांनाही घरात नकोसे होते. त्यांना नैतिकतेचे, सामंजस्याचे, सुस्वभावाचे डोस देणे सुरू होते. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यायचे असेल तर हे वातावरण बदलण्याची आवश्यकता आहे. मुलगे आणि मुली या दोघांवरही ज्येष्ठांच्या देखभालीची जबाबदारी असायला हवी. वडिलांच्या संपत्तीत मुलींना मुलांएवढाच वाटा देण्याचा कायदा असेल आणि तो मुलींकडून अधिकाराच्या प्रस्थापनेसाठी वापरला जात असेल तर मुलींवर  सुद्धा जबाबदारीही टाकली पाहिजे. विनाअट बक्षीस पत्र दिल्याने वृद्धापकाळात जरी भेट दिलेली संपत्ती परत घेण्याची पालकांची ईच्छा असली तरी ते असं कायद्याने करु शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपली संपत्ती मुलांच्या नावे मालमत्ता बक्षीस पत्र करताना मुलं आपला वृद्धापकाळात योग्य ती काळजी घेतील अशी अट घातली पाहिजे. जर मुलांनी अशा सुविधा आणि भौतिक गरजा प्रदान करण्यात नकार दिला किंवा ते यात अपयशी ठरले तर साहजिकच कायद्यानुसार मालमत्ता हस्तांतरण फसवणूक किंवा जबरदस्तीने किंवा अवाजवी प्रभावाने केले गेले आहे असे मानले जाईल. असे हस्तांतरण नंतर हस्तांतरणकर्त्याच्या विनंतीनंतर रद्द करण्यायोग्य बनते आणि देखभाल न्यायाधिकरणाला हस्तांतरण रद्द म्हणून घोषित करण्याचा अधिकार प्राप्त होतो.

                जेव्हा तुम्ही तुमच्या मालमत्तेचे कोणतेही मूल्य न घेता विनामूल्य हस्तांतरित करता, तेव्हा ते बक्षीस पत्र म्हणून केले जाते. साधारणतः एखादी व्यक्ती जवळच्या नातेवाईकालाच मालमत्ता भेट देऊ शकते. भेट म्हणून दिलेली मालमत्ता सहसा परत करता येत नाही. मालमत्ता हस्तांतरण कायद्याचे कलम १२६ बक्षीस पत्र कोणत्या परिस्थितीत रद्द केले जाऊ शकते याच्याशी संबंधित आहे. भेट देणारा आणि घेणारा दोघेही या मुद्द्यावर सहमत असल्यास, बक्षीस पत्र परस्पर संमतीने निलंबित किंवा रद्द केली जाऊ शकते. जर बक्षीस पत्रावर वर स्वाक्षरी करूनही मालमत्ता हस्तांतरित केली गेली नाही आणि भेट देणाऱ्याने नंतर त्याचा/तिचा निर्णय बदलला, तर बक्षीस पत्र त्याच्या इच्छेनुसार रद्द केली जाऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने आपले राहते घर आपल्या भावाला बक्षीस पत्र केले. तरी जोपर्यंत ते नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत त्या घराचा मालकी हक्क भावाला मिळत नाही. फसवणूक किंवा जबरदस्तीने मिळवलेली मालमत्ता रद्द केली जाऊ शकते. जर बक्षीस पत्रामध्ये मालमत्ता भेट देण्यासाठी आवश्यक अट म्हणून कोणतीही तरतूद असेल, आणि ती पूर्ण झाली नाही, तरीही बक्षीस पत्र रद्द केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर एका वडिलांनी आपल्या मुलाला त्याची संपत्ती या अटीवर भेट दिली की तो त्याची आयुष्यभर काळजी घेईल आणि नंतर मुलाने ही जबाबदारी पार पाडली नाही, तर वडील त्याचे बक्षीस पत्र रद्द करून मालमत्तेवर परत दावा मिळवू शकतो. अशा एका प्रकरणात २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ज्येष्ठ नागरिक प्राधिकरणाचा निर्णय योग्य ठरवत मुलगा आणि सुनेच्या नावे केलेले एक बक्षीसपत्र रद्द केले आहे. आपली मालमत्ता आपल्या मुलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना बक्षीस पत्र देत असताना काही अटींच्या अधिन राहून जर बक्षीस पत्र दिले तर ज्येष्ठांचा वृद्धापकाळ निश्चितच सुरक्षित व सुखकारक जाऊ शकेल हाच सर्वोच्च न्यायालयाच्या या सल्ल्यातून घ्यावयाचा बोध आहे. 

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...