आता प्रशिक्षणानंतर महिलांनी निकष पूर्ण केल्यास त्यांना नौदलात मरीन कमांडो म्हणजे मार्कोस होण्याची संधी मिळेल. आजवरच्या इतिहासात भारतीय नौदलात अशी थेट नियुक्ती केव्हाच करण्यात आली नाही. या महिला कमांडोंना स्वयंसेवक म्हणून काम करावे लागेल. पुढील वर्षीच्या अग्निवीर भरतीमध्ये भारतीय नौदलात सामील होणा-या महिला अधिकारी आणि नाविक यांना मार्कोस प्रशिक्षणासाठी परवानगी देण्यात येईल. मरीन कमांडो भारतीय नौदलातील स्पेशल फोर्स कमांडो आहेत. नौदलातील मार्कोसना अनेक विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षित केले जाते. हे कमांडो समुद्र, हवेत आणि जमिनीवर विशेष मोहिमा राबवू शकतात. हे कमांडो शत्रूच्या युद्धनौका, लष्करी तळावर हल्ले करतात आणि विशेष डायव्हिंग ऑपरेशन्स सारख्या गुप्त मोहिमा पार पाडतात. मार्कोस हे सागरी क्षेत्रातील दहशतवाद्यांशी लढून त्यांना चोख प्रत्युत्तर देतात. सध्या काही मार्कोस दहशतवादविरोधी भूमिकेत काश्मीरमधील वुलर लेक परिसरात तैनात करण्यात आले आहेत.
या कमांडोंनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुकाबला करताना हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो जगातील युद्धकौशल्यातील मानाचे पान समजले जाते. विविध देशांच्या कमांडो प्रशिक्षणात त्याचा सातत्याने गौरवाने उल्लेख केला जातो. अमेरिकेच्या मरिन कमांडो आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही कमांडो युनिटखालोखाल भारताच्या मार्कोसचे नाव घेतले जाते. या मार्कोस दलात आता महिला कमांडो सामील होणार आहेत. मात्र या दलात समाविष्ट होण्यासाठी अत्यंत कठोर अशा चाचण्यांतून जावे लागणार आहे. सर्वच कमांडोंना या चाचण्या अत्यावश्यक असतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अवघे २० टक्के असते. मार्कोसने आतापर्यंत श्रीलंकेतील लिट्टेविरोधी मोहीम, जम्मू काश्मीरमधील अतिरेकीविरोधी मोहिमा, हिंद महासागरातील समुद्री चाचेविरोधी मोहिमा, लेहमधील तैनाती आदी मोहिमा हाताळल्या आहेत. त्यातील ताज हॉटेल कारवाई मोहीम सर्वाधिक प्रकाशझोतात आली. नौदलाच्या पाठोपाठ हवाई दलाच्या गरुड या कमांडो दलातही महिला कमांडोंच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबतच्या निर्णयावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. महिलांना आता जमीन, पाणी, हवेतही देशसेवा करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नौसेना यासाठी मोठी पावलं उचलत आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही, मात्र लवकरचं ही ऐतिहासिक घोषणा होण्याची शक्यता आहे. नौदलाने विशेष ऑपरेशन्सपासून ते फ्लाइंग आणि युद्धनौकापर्यंत सर्व शाखांमध्ये महिलांसाठी दरवाजे खुले केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी समान संधी असलेल्या तटस्थ दलात नौदलाचे रूपांतर पाहायला मिळत आहे. त्यामुळे महिलांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असणार आहे. तिन्ही सैन्यदलांमध्ये महिला आधीच वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. भारतीय नौदल ओडिशातील आय.एन.एस. चिल्का प्रशिक्षण केंद्रात महिलांसह अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीला प्रशिक्षण देत आहे. नौदलाच्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीत ३,००० प्रशिक्षणार्थींचा समावेश असून यामध्ये ३४१ महिला देखील सहभागी आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे कमांडो होणे हे देशातील महिला सक्षमीकरणासाठी एक नवे पाऊल ठरेल. या निर्णयामुळे भारतीय महिलांना नोकरी आणि व्यक्तीमत्व विकासाची तसेच जीवनमान उंचावण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. भारतीय लष्करी इतिहासातील हा खरोखरच गौरवशाली क्षण आहे.
- सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा