कोणत्याही स्थलांतराच्या अनेक बाजू असतात. राष्ट्र, भाषा, जात/जमात, श्रद्धा, अस्मिता, त्यांचे राजकारण आणि बाजारपेठेवर-अर्थकारणावर प्रभाव टाकणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक गुंतागुंती इत्यादी मुद्द्यांवर मूळचे आणि बाहेरचे यांच्यात होणारा संघर्ष आणि नंतरचे जुळवून घेणे या प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. अनेकदा समाजातील या स्थलांतराच्या, समाजात मिसळून जाण्याच्या किंवा जुळवून घेण्याच्या प्रक्रिया अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. रशिया युक्रेन युद्ध असो की वातावरण बदल असो कधी कुठे भुकंप तर कुठे नवनवीन आजार. पण यासर्वांचा प्रभाव स्थलांतरावर होतो. स्थलांतर हे स्थायी आणि अस्थायी असे दोन्हीही असू शकते. यामागे अनेक कारणे आहेत. युद्ध, असुरक्षा, हवामान बदल, रोजगार या सारख्या गंभीर समस्येमुळे अनेक लोक आपली रहीवासी जागा सोडून दूस-या ठिकाणी स्थलांतरीत होतात. पण जेव्हा ते दुस-या ठिकाणी पोहचतात त्यावेळी त्या ठिकाणचे लोकांना ते ओझे वाटू लागतात. २०२१ मध्ये जवळपास ५.९ कोटी लोकं स्थलांतरीत झाले होते मात्र हे लोकं कोण होते, हे समजून घेणेही तितकेच गरजेचे आहे. हे लोक ते होते की आपला देश सोडत दुस-या देशात स्थलांतरीत झाले किंवा बॉर्डर पार करुन दुस-या देशाच्या बॉर्डरवर राहायला गेले. कोरोना काळात अनेकांचा रोजगार दगावला. त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केले. मोठ्या शहरातून लोक गावाकडे परतले. कोरोनाच्या काळातील झालेली स्थलांतरे आणि त्या स्थलांतरप्रक्रियेत झालेल्या कामगारवर्गाच्या व त्यांच्या लेकराबाळांना भोगाव्या लागलेल्या हालअपेष्टा या वास्तवाला अधिक गडद करून गेल्या. या काळात लाखो स्थलांतरित मजूर, कामगार शेकडो-हजारो मैल रस्ते तुडवत आपापल्या गावी परतू लागल्याचे दृश्य या देशाने पाहिले. वाहतुकीच्या तुटपुज्या व्यवथेमध्ये होत असलेल्या या स्थलांतराच्या कहाण्यांनी, काहींना थेट १९४७ च्या फाळणीच्या वेळी झालेल्या ऐतिहासिक स्थलांतराची आठवण झाली. स्वातंत्र्योत्तर भारताच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच स्थलांतराची समस्या ही मोठी समस्या आहे याची किमान जाणीव इथल्या समाजाला आणि सरकारला झाली. आता कोरोनाचा धोका संपताच लोक पून्हा शहराकडे स्थलांतरीत होताना दिसत आहेत.
स्थलांतर ही एक गरज झालेली आहे. गावाकडचे लोकं शहरात स्थलांतरीत होत आहेत. सध्या जगाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहते आणि येत्या २०५० पर्यंत हे प्रमाण दोन तृतीयांश किंवा ६६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या मते प्रत्येक तीस व्यक्तींमध्ये एक व्यक्ती स्थलांतरीत करत असतो. स्थलांतर ही अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या इर्षेतून स्फुरलेली म्हटली तर नैसर्गिक क्रिया आहे. मात्र गेल्या शतकभरातल्या देशोदेशींच्या नेत्यांनी केलेल्या शत्रूकेंद्री राजकारणामुळे ही प्रक्रिया समस्या बनलेली आहे. मागील काही दशकात आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत लोकांचीही संख्या वाढली आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या जगाच्या इतिहासात कधी नव्हे ते लोक मातृभूमी सोडून अन्य देशात स्थलांतरित होत आहेत. हे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित नागरी क्षेत्रांतच राहतात. जागतिकीकरणाच्या या युगात भांडवल, तंत्रज्ञान, मालवाहतूक आणि सेवा व माणसे यांची वाहतूक किंवा स्थलांतर हा महत्त्वाचा भाग ठरला आहे. त्यामुळे नागरीकरण ही समाज, तसेच अर्थव्यवस्थांची परिवर्तनशील प्रक्रिया आहे. त्यामुळे शाश्वत शहरे आणि मानवी वहन या विषयांवर सर्वंकष आणि संतुलित दृष्टिकोनाची गरज आहे. स्थलांतरामुळे शहरांमध्ये नव्या कल्पना, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैविध्य येत असले, तरी अनियोजित नागरीकरण व स्थलांतरामुळे विकासाचे काही गंभीर प्रश्नही तयार झाले आहेत. सेवापुरवठा आणि राहणीमान यांच्यावर नकारात्मक परिणाम होत आहे. मूळ रहिवासी आणि स्थलांतरित यांच्यातील दरीही दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्थिती कायम राहिली, तर नागरीकरणात आणखी गंभीर प्रश्न निर्माण होतील.
-सुरेश मंत्री
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा