आजवर कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. गेली अनेक वर्षं बुद्धिबळासारख्या खेळात कृत्रिम बुद्धिमत्ताने आव्हान दिलं होतंच; पण आताही आरोग्यसेवेपासून ते वित्त, वाहतूक ते उत्पादनापर्यंत सगळी कार्यं स्वयंचलित करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण कामं साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगात आणली जात आहे. सुरुवातीला ह्या तंत्रज्ञानाचे टीकाकार म्हणायचे, कितीही झालं तरी मानवी मनाचा परमोच्च आविष्कार म्हणजे त्याने निर्माण केलेल्या कला, संगीत, चित्रकारिता... ह्या सगळ्या उजव्या मेंदूच्या कलात्मक गोष्टी. यात कृत्रिम बुद्धिमत्ता काही करू शकणार नाही. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काल्पनिक चित्रं, चेहरे, संगीतसुद्धा तयार होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आता सिनेमाची पटकथाही लिहू लागले आहेत ! चित्रकलेत तर मानवालाही मागे टाकू शकेल, नवे कायदे बनवू शकते. आदी अगदी सर्वकाही करतेच आहे. कर्करोगासारख्या दुर्धर रोगांचं त्वरित निदान व्हावं आणि त्यावर औषधंही तयार व्हावीत यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. गुगलसारखी कंपनी डायबेटिसमुळे येणारं अंधत्व टाळण्यासाठी आणि त्याचं लवकर निदान व्हावं म्हणून प्रयत्न करते आहे.
कल्पनाशक्तीच्या जोरावरच मानव समाजाची प्रगती होत आली आहे. आता हे कामसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता करत असेल तर मग मानवाला काय काम राहील ? वास्तविक कृत्रिम बुद्धिमत्ता हे आतापर्यंत केवळ एक साधन होते. ते आपल्याला विश्लेषणात मदत करीत असे अथवा सूचना देत होते. परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेने कल्पना करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासही सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:च नवे विचार, नव संस्कृतीला आकार देऊ शकतात. अत्यंत धोकादायक अणुबॉम्ब स्वत: एखादा नवा अणुबॉम्ब तयार करू शकत नाही, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत: विचार करुन तिच्यापेक्षा कैकपटीने जास्त घातक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करु शकते.
तंत्र, उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची
तीव्र स्पर्धा ही धोकादायक असून त्यामुळे अनियंत्रित झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या
डोक्यावर बसेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मानवी बुद्धीमत्तेशी स्पर्धा करणा-या
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अतिरेक हा मानवासाठी भस्मासुर ठरेल. त्यामुळे इंटरनेटवर
खोट्या, चुकीच्या, अनावश्यक आणि घातक माहितीचा महापूर लोटेल. तीव्र
स्पर्धेतून निर्माण करण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने कालांतराने हाताबाहेर
जातील. त्यांच्यावर निर्मात्यांचेही कसलेच नियंत्रण राहणार नाही. अशा परिस्थितीत
त्यांना वठणीवर आणण्यासाठी काय करावे लागेल, हे अनाकलनीय असेल अशी भीती सध्या व्यक्त करण्यात
येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सध्या गुन्हेगारी
प्रवृत्ती विशेषत: दहशतवादी संघटनाही करीत
आहेत.
कृत्रिम
बुद्धिमत्ता विकसित केल्याने मानवजातीचा अंत होण्याची भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग
यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. आर्टिफिशियल
इंटेलिजन्स या संकल्पनेचा प्राथमिक विकास आपण याआधीच केला आहे. मात्र या संकल्पनेचा संपूर्ण विकास
मानवजातीसाठी प्राणघातक ठरेल. हे झपाट्याने विकसित झालेले तंत्रज्ञान मानवजातीच्याही
पुढे जाऊ शकते. मानवास नैसर्गिक उत्क्रांतीच्या मर्यादा आहेत. संपूर्णत: विकसित
झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सामना मानव करु शकणार नाही व तो नष्ट
होईल, असे जगामधील सर्वांत
प्रतिभावान शास्त्रज्ञांपैकी एक मानल्या जाणा-या हॉकिंग यांनी सांगितले होते. मात्र हॉकिंग यांनी आधुनिक
तंत्रज्ञानाच्या फायद्यांपासून वंचित राहणे योग्य नसल्याचे मतही यावेळी व्यक्त
केले होते.
इंटरनेटचे फायदे व तोटे दोन्ही असल्याचे हॉकिंग यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
तंत्रज्ञानाच्या वापरामधील अशा स्वरुपाचे धोके टाळण्यासाठी कंपन्यांनी अधिक
प्रभावशाली उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र स्वातंत्र्य व खासगी आयुष्य
यांचा त्याग न करता अशा स्वरुपाची उपाययोजना करणे तितकेच कठीण आहे. सध्या इंग्लंडमध्ये
आणि युरोपियनच्या सदस्य देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे नियमन
करण्यासाठी कायद्याची चौकट आखण्याचे काम सुरू आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा