मुख्य सामग्रीवर वगळा

काळजाचा ठाव घेणारी साहित्यकृती ‘पाचाट'

 

पुस्तक परीक्षण
 सुरेश मंत्री
मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील रहिवाशी असलेले माझे मित्र परशुराम गहिनीनाथ नागरगोजे यांच्या ‘पाचाट’ या लघुकादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले. मुळ व्यवसायाने विमा प्रतिनिधी असलेले परशुराम नागरगोजे यांची ही पहिलीच कादंबरी. या कादंबरीच्या निमित्ताने त्यांचा साहित्य विश्वात लेखक म्हणून प्रवेश झाला आहे. परशुराम नागरगोजे यांनी स्वत: बालपणी भोगलेल्या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील जीवन संघर्षाची कहानी शब्दबद्ध करून लिहिलेली पाचाट ही साहित्यकृती आहे. या कादंबरीतून त्यांनी अल्पभूधारक शेतकरी, शेतमजुर, ऊसतोड कामगारांच्या कौटुंबीक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यविषयक समस्या अत्यंत पोटतिडकीने मांडल्या आहेत. त्यांनी ही लघुकादंबरी मला समीक्षणासाठी पाठवून दिली आणि ती माझ्या हातात पडताच मी एका दमात वाचून काढलीही. पण पाचाटचे वाचन केले असता त्यांचे नवखेपण कुठेच जाणवले नाही. अत्यंत संयत, संयमाने आणि आत्मविश्वासाने त्यांनी ही कादंबरी लिहिल्याचे पदोपदी जाणवते. कादंबरी वाचत असताना त्यातील प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. योग्य त्या ठिकाणी  निसर्ग वर्णन, प्रसंग वर्णन, पात्रांच्या मनात चाललेले विचारांचे वादळ स्वगताच्या रूपाने उभा करून त्यातील प्रत्येक पात्र आणि एकूण पूर्ण कादंबरीला अधिकाधिक जीवंत करण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. आळंदी देवाची येथील योगिराज प्रकाशनाने या पुस्तकाचे प्रकाशन केलेले असून मुखपृष्ठ अत्यंत बोलके आणि आकर्षक आहे. या कादंबरीस डॉ. लता पाडेकर यांची प्रस्तावना लाभली आहे. एकूण १२८ पानांची ही कादंबरी असून तिची छपाई सुद्धा खूप उत्तम दर्जाची आहे. 
राज्यात आज जवळपास सव्वाशेवर साखर कारखाने सुरू आहेत. ऊस तोडणी करून या कारखान्यांना त्याचा पुरवठा करण्याचे काम ऊसतोड कामगार करतात. या कामगारांमुळेच साखर कारखानदारी आज एका उंचीवर पोहचू शकली आहे. साखर कारखानदारी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत असताना, ऊसतोड कामगारांची आर्थिक स्थिती मात्र सुधारलेली नाही. ऊसतोड कामगार दारिद्र्य, बेरोजगारी, कनिष्ठ दर्जाचे राहणीमान याच्या दुष्टचक्रात सापडल्याचे आढळते. वाढत्या महागाईने सधन लोकांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत, तिथे या ऊसतोड कामगारांची काय कथा ! ऊसतोड कामगारांच्या जीवनाची ही व्यथाच या कादंबरीतील मुख्य नायक गंगारामच्या रूपाने आपल्या समोर लेखकाने ऊभा केली आहे. या नायकाने अल्पभूधारक शेतकरी आणि ऊसतोड कामगार अशा दोन भूमिका निभावल्या आहेत. काळ्या आईवर तो आणि त्याचे कुटुंब अगदी मनापासून प्रेम करते. शेती हा त्याचा श्वास आहे मात्र त्यातील उत्पन्नावर त्याचा उदरनिर्वाह चालत नसल्याने दरवर्षी ऊसतोडीला जाणे ही त्याच्या आयुष्याची विवंचना आहे. यात त्याला प्रत्येक पावलावर साथ देणारी, तो नाउमेद झाला असता त्याचा उत्साह वाढवणारी त्याची अर्धांगिनी कौशल्या आहे. जितके कष्ट गंगारामच्या वाट्याला येतात, त्याहून अधिक कौशल्याने कौशल्या कामाचा निपटारा करते. ‘‘आपल्या जीवाच रान करायच ; पण लेकरांच्या नशिबी आसलं जिणं येऊ द्यायचं नाही. लेकरं शिकवायची, मोठी साहेब करायची. पैसा कमी पडला तर शेतं इकायची ; पण पोरांच कल्याण करायचं’’ या स्वगतातून तिची आपल्या कुटुंबाप्रती काळजी दिसून येते. स्त्रियांसाठी, लहान मुलांसाठी हळवा झालेला हा लेखक मातृहृदयी आहे. लहान मुले, स्त्रिया यांच्यासाठीचं हे हळवेपणच लेखकाला माणूस म्हणून एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.
                                       ऊसतोडीचा हंगाम दरवर्षी साधारणतः नोव्हेंबर महिन्यात सुरू होऊन, तो मार्च-एप्रिलपर्यंत चालतो. या पाच-सहा महिन्यांसाठी कामगारांना कामासाठी स्थलांतर करावे लागते. हंगामादरम्यान त्यांना तात्पुरत्या खोपी किंवा पालात राहावे लागते. एका ठिकाणचा ऊसाचा फड संपल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी बाडबिछाना हलवावा लागतो. तेथे त्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी वा शौचालय या सुविधांची वाणवा असते. कडाक्याची थंडी, ऊन, वादळ‌‌-वारा, अवकाळी पाऊस यासारख्या अनेक समस्यांना तोंड देत ऊसतोड कामगारांचे काम सुरू असते, अविरतपणे. यांचा दिवस पहाटेच सुरू होतो तो ऊस तोडणी, बांधणी आणि वाहनांमध्ये लादनी करता करता कधी संपतो ते कळत नाही. दिवसाकाठी दोन ते अडीच टनाची गाठ घालण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यावरच त्यांची दिवसाची मजुरी ठरते. राज्यातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांमध्ये ऊसतोड मजुरी ही वेगवेगळी आहे. या कामगारांना दिवसाकाठी जवळपास ७०० ते ८५० रुपये मजुरी मिळते. असे असले तरी त्यात सातत्य नाही, हेही तितकेच खरे. साखर कारखान्याचा तांत्रिक घोटाळा, नैमित्तिक क्लिनिंग, वाहनाचा घोटाळा, वा हवामानातील बदल यामुळे चार-चार दिवस कामाचे खाडे पडतात. तेव्हा त्याची मजुरी मिळत नाही. मुकादमाकडून उचललेली उचलही न फिटल्याने दरवर्षी ऊसतोड कामगाराकडेच बाकी राहते. त्यामुळे ऊसतोड कामगारासाठी मुकादम कधी मद्दगार तर कधी खलनायक ठरतो. ‘‘अरं ! हितच सगळा सिजन गेला. काही केलं नाहीस अन गावाकडं गेल्यावर दात पाडून देणार हायस काय ? गंगाराम तूझं तू काहीबी कर अन माझी बाकी देवून टाक. त्याच्याशिवाय तुला गावाकडं जाऊ देणार नाही ’’ असं म्हणणारा मुकादम वाचकांचा तिळपापड करून जातो. 
दुसरीकडे, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक सुविधांची मोठी कमतरता आहे. कामाच्या ठिकाणी शाळेची सुविधा नसल्याचे अनेक कामगारांचे म्हणणे आहे. तर ज्या ठिकाणी शैक्षणिक सुविधा आहेत, त्या ठिकाणच्या पाल्यांच्या शाळेची वेळ, परत येण्याची वेळ, अभ्यास याकडे लक्ष द्यायला पालकांना वेळ नसल्याचे दिसते. याचा एकंदरीत विपरीत परिणाम पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान त्यांना परत दारिद्र्याच्या चक्रात लोटणारे आहे, हे सत्य. त्यामुळे पिढ्यान-पिढ्या कोयता काही हातचा सुटत नाही. आपली मुलं शिकली  तर कोयता नक्की सुटेल या आशावादाने मुलांना शिकवण्यासाठी गंगाराम आणि त्याची पत्नी दिवसरात्र राब राब राबताहेत.
ग्रामीण भागात पाचाट हा शब्द जवळपास सर्वांच्या परिचयाचा आहे. ऊसाचा पाला म्हणजेच पाचाट. पाचाट हे एकतर जाळले जाते किंवा जमीनीमध्ये कुजवले जाते. जोपर्यंत ऊस खाण्यायोग्य होत नाही तोपर्यंत ते ऊसाचे रक्षण करते. एकदा का ऊस तुटून गेला की, ऊसाची साखर होते व पाचटाची माती होते. अगदी काहीसे असेच या साहित्यकृतीतील गंगाराम या नायकासोबत घडले आहे. सुरवातीला समाजव्यवस्थेने आणि नंतर काळाने क्रुर चेष्टाच केली. त्याच्यावर नियतीने मांडलेला डाव पाहिला असता वाचकाचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही, मन गहिवरल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यभर पाचाटाशी संगत केलेल्या नायकाच्या आयुष्याच कथेच्या शेवटी पाचाट होत. म्हणून लेखकाने या साहित्यकृतीला दिलेलं पाचाट हे नाव सर्वार्थाने फलद्रूप झाल्याची अनुभूती येते. 
अस्सल ग्रामीण भाषेत लिहिलेली पाचाट ही कादंबरी ऊसतोड कामगारांची व्यथा मांडणारी तर आहेच. सोबत यातून कौटुंबीक सौख्य, सहकार, मोठ्यांचा आदर, मातृ-पितृ भक्ती, सामंजस्य, परिस्थितीची जाण या संस्कारांची न कळत पेरणं झाल्याची पहायला मिळते. ऊसतोड कामगारांच्या समस्या, जगण्याचा जीवघेणा संघर्ष, वारंवार स्थलांतर आणि विस्थापन, तरीही जगण्याचा दुर्दम्य आशावाद आणि दारिद्रयाचे दशावतार अशा विदारक सामाजिक प्रश्नावर एका ऊसतोड कामगाराची ह्रदय पिळवटून टाकणारी अत्यंत करूणामय कहानी वाचल्यावर वाचक अंतर्मुख आणि दिडमूढ होवून जातो, हेच या कादंबरीचे यश आहे. मला खात्री आहे, ही कादंबरी वाचकांच्या नक्कीच पसंदीस पडेल आणि वाचकांच्या हिच्यावर उड्या पडतील. लेखकाने पुस्तक आपल्या हाती दिले आहे. आता आपण लेखकाच्या आशावादाला वाचक व संवेदनशील माणूस म्हणून प्रतिसाद देऊया. परशुराम नागरगोजे यांच्या पूढील साहित्य वाटचालीस माझ्या खूप-खूप शुभेच्छा !




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...