मुख्य सामग्रीवर वगळा

हरवत चाललेल्या मानवी संवेदना

                     
   नात चीड आणणा-या नुकत्याच घडलेल्या काही घटना. मुंबईच्या जवळ उल्हासनगरमध्ये दोन लहान मुलांनी मिठाई चोरली म्हणून त्यांना नग्न करून त्यांचे मुंडन केले गेले. या मुलांना चपलाचा हार घातला गेला आणि याचा व्हिडिओ ही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. झारखंड मध्ये लहान मुलाच्या अपहरणाच्या संशयावरून आठ लोकांची खुलेआम हत्या करण्यात आली. काय चाललं आहे या आधुनिक जगात. स्पर्धेच्या या युगात आपला स्वार्थ वरचढ होत आहे,नाती मागे पडत चालली आहेत.या जीवघेण्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर विकास साधण्याच्या ईर्षेत आपण मानवतेच्या बाबतीत मात्र मागे पडत चाललो आहोत का?स्नेह,प्रेम, जिव्हाळा,आपुलकी, भूतदया या संवेदना आपण हरवत चाललो आहोत का? 
आपल्याला दररोज वर्तमानपत्रात किंवा वृत्तवाहिन्यांवर माणुसकीला काळिमा फासणा-या अनेक बातम्या दिसतील.रोहतक मध्ये १० वर्षे वयाच्या मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने बलात्कार केला त्यामुळे ती गर्भवती राहिली.अशा प्रकारच्या बातम्या कानावर पडल्या की दु:ख तर होतेच पण चीड सुद्धा तेवढीच निर्माण होते.आजच्या या युगात जणू माणुसकी ही गोष्टच आपल्या खात्यात नाही.आज आपण आपली नीतीमूल्ये हरवून बसलो आहोत का असे वाटायला लागते.आज दुस-यांची मदत करणे तर दूरच, त्यांच्या विवशतेचा फायदा घेण्याअगोदर साधा विचार सुद्धा केला जात नाही. 
आज आपण आपल्या शेजा-यांशी किती प्रमाणात आत्मियतेचे संबंध बनवितो.आपल्या शेजारी नेमके कोणते कुटुंब राहते हेच आपल्याला माहित नसते.आपल्या शेजारच्या घरात जर कुणाचे निधन झाले तर ते आपल्याला रडण्याचा आवाज कानी पडल्यावरच माहीत होते.सध्या आपल्याला कुणाच्या घरी जायचे असेल तर अगोदर दहा वेळा विचार करावा लागतो की ते व्यस्त तर नसतील ना?... चला नको त्यांच्या घरी जायचे, फोनवरच बोलून भागवूया.परिस्थितीतच अशी आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या एका खूप जवळच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे सहकुटुंब येण्यासाठी खूप आग्रह केला होता.मीही त्यांच्याकडे जाण्याचे निश्चित केले.आम्ही खरोखरच येणार आहोत हे कळाल्यावर त्यांना काय म्हणावे हे कळेना. त्यांनी त्यांना रविवारीही सुट्टी नसल्याचे कारण पुढे केले. पूढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. अर्थातच त्यांच्याकडे जाण्याचा बेत रद्द करावा लागला.आज कुणाकडेही कुणासाठी साधा वेळ नाही.आजचा जमाना तर व्हाट्सअ‍ॅप आणि फेसबुक सारख्या सोशल मीडियांचा आहे. आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी, मित्र, आप्तांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याऐवजी या आभासी जगात जगत आहोत.फेसबुकवर अनेक मित्र कमावलेत आपण पण जिव्हाळ्याचा खरा-खुरा एकही मित्र नाही.व्हाटसअॅपवर भरपूर मेसेज पाठवतो आपण पण प्रत्यक्ष भेट झाल्यावर साधी एक दूस-याची खुशाली सुद्धा विचारत नाही.जो-तो पळतो आहे केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी. 
अगदी काल-परवा मेरठ मध्ये एका शाळकरी मुलीला एका ट्रकने चिरडले होते.तिच्या आईला ही घटना कळताच ती घटनास्थळाकडे धावली.गंभीर जखमी झालेली तिची मुलगी तडफडत होती.तिच्या आईला तरी ती वाचेल असे वाटत होते.तिची आई तिला कवेत घेऊन मदतीसाठी याचना करित होती,माञ कोणीही मदतीसाठी पूढे आले नाही.उलटपक्षी बघ्यांपैकी अनेकजण ही घटना आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्यात गुंतले होते. अखेर त्या मुलीने वेळेवर मदत न मिळाल्याने आईच्या खांद्यावरच प्राण सोडला.माणूस किती संवेदनाशून्य झाला आहे हे दर्शविणारे हे उदाहरण.अनेक अपघाताच्या ठिकाणी लोकांकडून मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची अशी अनेक उदाहरणे आहेत.
ब-याच दिवसांपासुन आमची कामवाली बाई कामावर आली नव्हती.फोन केल्यावर कळाले की,ती आजारी आहे.तिने सांगितले की, सकाळपासून अनेक जणांचे फोन येवून गेलेत,जे थोड्यावेळेसाठी का होईना कामावर येण्यासाठी सांगत आहेत.माझ्या आजारपणाबद्दल माञ कुणी आस्थेने विचारले नाही ना कुणी मदतीसाठी विचारणा केली.प्रत्येक जण फक्त कामावर न येण्याचा राग व्यक्त करित होता.प्रत्येकाची कामाची गरज लक्षात येते पण या गरजेपूढे मानवी संवेदना फिक्या पडल्यात का?जी कामवाली बाई रोज मेहनत करते, आपल्या घरची उष्टी भांडी घासते, साफसफाई करते तिच्या अडचणीला आपण मानवतेने समजून का घेत नाहीत?ना पैसा सोबत जाणार आहे ना ऐशो-आराम. सोबत जाणार आहेत ती फक्त नाती, जी आज आपण फक्त पैसा आणि प्रसिद्धीच्या जोरावर बनवण्याचा प्रयत्न करित आहोत. 
पूर्वी आपला एखादा सहकारी सेवानिवृत्त झाला की त्याला निरोप देताना डोळे भरून यायचे.त्या सहका-यालाही आपण खूप काही मागे सोडून चाललो आहोत असे वाटायचे.अनेक वर्षे सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला विचारा, घरी बसल्यावर किती एकाकी वाटते ते.आज स्थिती काय आहे?आज कोणी सहकारी निवृत्त होताना किती लोकांना दु:ख होते.फार विचित्र वाटते की,अनेक वर्षे एकत्र काम केल्यानंतर सुद्धा नाती मात्र जोडता आली नाहीत.अशी नाती ज्यात कुणाच्या जाण्याचे दु:ख असेल.ही कहानी आता जवळपास प्रत्येक कार्यालयाची आहे, जिथे लोक कधीही न थांबणा-या या जीवघेण्या स्पर्धेत कितीही थकवा आला तरी फक्त आणि फक्त पळत सुटले आहेत.
चांगल पेरल की चांगलच उगवत. जशी पेरणी तशीच कापणी.आपल्या भावी पिढीबद्दल आपण काहीस असच करत आहोत. आपल्याकडे आपल्या कुटुंबातील सदस्यांना, आपल्या मुलांना द्यायला वेळच नाही. आपसातील जिव्हाळा संपल्याने एकत्र कुटुंब पद्धती धोक्यात आली आहे.आपली मुलही आपुलकी आणि प्रेमासाठी आसुसलेली दिसतात.वेळेअभावी त्यांच्या भावनात्मक गरजांकडे आपण लक्ष देत नाहीत.त्यांना समजून घेण्यासाठी, समजावण्यासाठी आपण वेळच देत नाही. नियमीत तणावाखाली राहिल्याने लहान मुलांच्या आत्महत्यांची प्रकरणे समोर येत आहेत.आज आपण एकमेकांपासून दूरावत चाललो आहोत.आज आपल्या पिढीची ही अवस्था आहे तर येणाऱ्या पिढीकडून काय अपेक्षा करता येतील. 
आज कुणाला कुणाच्या समस्येशी काही एक देणे घेणे नाही.एवढा वेळ ही नाही कुणाकडे की,कुणाची अडचण ऐकुण त्याची मदत करता येईल.आज जग हे व्यावहारिक झाले आहे.प्रत्येक जण आज विचार करताना दिसतो की, मला काय याचे?काय फरक पडतो? हे तर नेहमीचच आहे. आपुलकी, प्रेम,जिव्हाळा या गोष्टी सार्वजनिक जीवनातून गायब होत आहेत.माणसापेक्षा माकडं बरी हे म्हणण्याची वेळ आली आहे. याला काही प्रमाणात तंत्रज्ञानही जबाबदार आहे. व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकवर आपण शुभेच्छा देऊन आपली जबाबदारी निभावत आहोत.स्वकियांपेक्षा त्यांच्याच जास्त संपर्कात आहोत ज्यांना आपण फक्त सोशल मीडियावरच ओळखतो.मोबाईल संस्कृतीमुळे जग छोट झालय खरं,माणस मात्र दूरावत चाललीत. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकीन्स यांनी म्हटले आहे की, भविष्यात यंत्रांचे युग येईल. यंत्र मानवावर सत्ता गाजवतील. याचा अर्थ आज लक्षात येतोय. खरोखरच आज आपण माणूस कमी यंत्र जास्त बनत चाललो आहोत.यंञासोबत काम करता-करता मानवी संवेदना गोठत चालल्या आहेत, नाती मागे पडत चालली आहेत. आपल्या गरजा पूर्ण करता-करता प्रेम, संवेदना आणि सहानुभूती या गोष्टी हातातून निघून चालल्या आहेत. आपण फक्त यंत्र बनवून राहिलो आहोत. होय असे यंञ ज्याला संवेदनाच नाहीत. 
-सुरेश मंत्री, धारूर
मो.नं-9403650722

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...