काश्मीर मध्ये गेल्या सोमवारी दहशतवादयांनी अमरनाथ यात्रेकरूंच्या
बसवर हल्ला केला.या हल्ल्यात ७ यात्रेकरूंचा मृत्यू झाला तर २५ यात्रेकरू जख्मी
झाले.दहशतवादयांनी यावेळी केवळ यात्रेकरूंवर हल्ला केला नाही तर पोलिसांवरही हल्ला
केला.तस पाहिल तर हा अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला पहिला हल्ला नाही.यापूर्वीही
अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवादयांनी १० पेक्षा जास्त हल्ले चढविले आहेत.या
हल्ल्यांपैकी काही हल्ले अयशस्वी झाले होते तर इ.स.२००० मध्ये पहलगाम मध्ये
झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३२ अमरनाथ यात्रेकरूंसहित ३५ नागरिकांचा मृत्यू झाला होता.खरं
तर या हल्ल्याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे मात्र या हल्ल्याची निंदा
करण्याच्या आडून काही लोकांनी धार्मिक विरोधाचे राजकारण करण्याचा जो प्रयत्न
चालवला आहे तो निंदनीय आहे.
गेल्या सोमवारी गुजरात मोटार
परिवहनची मान्यता असणारी बस क्रमांक जीजे ०९ जेड ९९७६ ही बस अमरनाथ यात्रेकरूंचे
दर्शन झाल्यानंतर परतत होती.या बस मध्ये अधिकाधिक गुजरातच्या भाविकांचा समावेश
होता.अस सांगितल जात आहे की,ही बस जम्मू
आणि पहलगामच्या मधिल अमरनाथ यात्रेचा नियोजीत मार्ग सोडून श्रीनगर मध्ये होती,आणि परवानगी नसताना बस रात्री श्रीनगरहून जम्मूकडे जात होती.या बसवर हल्ला
रात्री ठिक ८ वाजून २० मिनिटांनी झाला.या वेळी श्रीनगर जम्मू राष्ट्रीय
महामार्गावर कसलीही सुरक्षा व्यवस्था नसते.
या प्रश्नाचे उत्तर अदयाप
येणे बाकी आहे की, ही बस
कुणाच्या सांगण्यावर रात्री श्रीनगरहून रवाना झाली.ही बस पूढे नेण्यासाठी
यात्रेकरूंनी दबाव आणला होता का?यात्रेकरूंना हे माहित
नव्हते का की हे अत्यंत जोखमीचे काम आहे.यात नेमके दोषी कोण आहेत,यात्रेकरू की सुरक्षा व्यवस्था हे चौकशीनंतर समोर येईलच.अमरनाथ
यात्रेकरूंवर हल्ला झाल्यानंतर वरच्या स्तरावरिल राजकारण खूप परिपक्व आहे,मात्र दूस-या स्तरावरिल नेत्यांनी,कार्यकर्त्यांनी
आणि समर्थकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यांनी सर्व हदी पार केल्या आहेत.यावर
आपण नंतर बोलणार आहोतच मात्र यापूर्वी या घटनेशी संबंधीत काही प्रश्नांवर नजर
टाकणे गरजेचे आहे.या बसचे चालक शेख सलिम गफूर भाई यांनी प्रसंगावधान दाखवले नसते
तर दहशतवादयांनी कदाचित मोठया घटनेला अंतीम स्वरूप दिले असते.या बसचे चालक शेख
सलिम गुजरात मधिल वलसाड येथील रहिवाशी आहेत आणि ते गत ८ वर्षांपासून यात्रेकरूंना
अमरनाथला घेवून जातात.
सलिम
यांनी सांगितले की,दहशतवादी
त्यांच्या बसवर गोळीबार करत होते मात्र त्यांनी बस काही थांबविली नाही.सलिम भाई
आपले डोके झुकवून ७० ते ८० कि.मी.च्या वेगाने बस पळवित राहिले.बाहेर खूप अंधार असल्याने
काहीच दिसत नव्हते.जेंव्हा त्यांना सैन्याचा कॅंप दिसला तेंव्हाच बस थांबवली.या बस
मधिल एका महिलेने सांगितले की, हा चालक एवढा धाडशी होता की,तीन बाजूंनी गोळ्या चालत असताना सुद्धा त्यांनी बस थांबविली नाही.सलिम
भाईंनी अनेक यात्रेकरूंचा जीव वाचवला.या घटनेच्या एक तासानंतर म्हणजे रात्री साढे
नऊ वाजता सलिम भाईंनी आपल्या भावाला फोन करून झालेल्या घटनेची सर्व माहिती दिली.जम्मू
काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी शेख सलिम यांना ३ लाख रूपये देण्याची
घोषणा केली आहे.दूसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना म्हटले आहे की,ते केंद्र सरकारकडे शेख सलिम यांना विरतेचा पुरस्कार देण्याची मागणी
करतील.
या बसवर हल्ला झाल्यानंतर
अधिकृत सूत्रांनी असे सांगितले होते की,या बसची नोंदणी अमरनाथ श्राइन बोर्डाकडे झालेली नव्हती,जर नोंदणी असती तर या बसला सुरक्षेच्या बंदोबस्तात दूपारी बारा वाजताच
जवाहर टर्नलच्या पलिकडे नेवून सोडले असते.बसचे चालक सलिम यांच्या म्हणण्यानूसार या
बसची नोंदणी झालेली होती.या बसमधिल यात्रेकरूंचे अमरनाथ दर्शन २ जुलैलाच झाले
होते.बसची जर नोंदणीच नव्हती तर यात्रेकरूंचे दर्शन झालेच कसे?चूक ही झाली की,दर्शन झाल्यानंतर सुरक्षा बंदोबस्तात
परतण्याऐवजी हे यात्रेकरू काश्मीरमध्ये पर्यटन व खरेदी करित होते.सलिमच्या
म्हणण्यानूसार या बस सोबत अन्य काही बसही होत्या मात्र या बसचे टायर पंक्चर
झाल्याने अन्य बसेस पूढे निघून गेल्या.पंक्चर काढल्यानंतर ही बस पूढे निघाली मात्र
यावेळीच या बसवर दहशतवादी हल्ला झाला.जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मते,रात्री सात नंतर श्रीनगर-जम्मू हायवेवर कोणतीही बस जावू शकत नाही.या बसने
सुरक्षेचे सहा नाके पार केले मात्र कुणीही या बसला रोखले नाही.हे कस होवू शकत
जेंव्हा तिथे कुठल्याही क्षणी दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अगोदरच वर्तविली
होती?या घटनेच्या चौकशी नंतर याला नेमक कोण जबाबदार आहे?सुरक्षा व्यवस्थेत चूक झाली का?हे सर्व समोर येईलच.
महाराष्ट्रातील डहाणूच्या
निर्मला ठाकुर याही या यात्रेकरूंमध्ये होत्या.त्यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला.त्यांची
मुलगी नितू सिंहने यात्रेच्या आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे.या घटनेची
देशातील सर्व धर्माच्या समुदायांनी निंदा केली आहे,मात्र काही लोक या घटनेचा आधार घेवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा
प्रयत्न सोशल मिडियावर करित आहेत.या घटनेचा आधार घेवून स्वत:ला जबाबदार म्हणनारे
हे लोक सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभा करत नव्हते,सरकारच्या
काश्मीर संदर्भातील नितीच्या यशस्वीतेवर प्रश्न चिन्ह उभा करत नव्हते तर ते त्या
लोकांवर प्रश्नचिन्ह उभा करत होते ज्यांच या घटनेशी कसलही देण-घेण नाही आणि
ज्यांनी यापूर्वीही झालेल्या अशा घटनांची निंदा केली आहे.
एका महिलेने केंद्रीय गृहमंत्री
राजनाथ सिंह यांच्या ट्विटर वर या घटनेवरून अभद्र शब्दांचा वापर केला.तिने लिहिले
की,आपले काम केवळ निंदा करणे नाही.हा हल्ला
करणा-या लोकांना वेचून मारा.यावर राजनाथ सिंह गप्प बसले नाहीत,नाही त्यांनी घुमवून-फिरवून उत्तर दिले.त्यांनी उत्तर दिले की,माझे काम देशाच्या प्रत्येक भागात शांतता आणि सद्भावना कायम ठेवणे
आहे.सर्वच काश्मीरी दहशतवादी नाहीत.सार्वजनिक ठिकाणी राजनाथ सिंह यांनी दिलेले हे
उत्तर एक आदर्श उदाहरण आहे.त्यांनी राजकारणाचा विचार न करता आपली घटनात्मक
जबाबदारी स्पष्ट शब्दात सांगितली की,गृहमंत्र्यांचे सर्वांची
चिंता करणे आणि सुरक्षा करणे हे काम आहे.त्यांच्या या उत्तरानंतर या महिलेला खूप
लाज वाटली आणि तिने आपले ट्विटर वरिल विधान खोडून टाकले.उमर अब्दुला सुद्धा
त्यांच्या या उत्तराने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी म्हटले की,मी आपल्याला नमन करतो.आपल्या नेतृत्वासाठी मी आभारी आहे.
काश्मीर मधिल अनेक नेत्यांनी या हल्ल्याची निंदा
केली आहे.यासिन मलिक,सैय्यद गिलानी,मीर वाइज उमर फारूक यांनी या घटनेचे सामुहिक निंदा केली आहे.त्यांनी म्हटले
आहे की,अमरनाथ यात्रा गेल्या कित्येक वर्षांपासून
शांततापूर्ण वातावरणात सूरू आहे.आम्ही मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी
आहोत.श्रीनगरच्या ट्रॅव्हल्सवाल्यांनीही निदर्शने करून या घटनेची निंदा केले
आहे.दिल्लीच्या जामिया मिलिया विदयापिठाच्या शिक्षकांनी प्रवेशद्वारावर मेणबत्ती
पेटवून आपल्या संवेदना व्यक्त केल्या.या अगोदर जमावाने केलेल्या मुस्लिम आणि दलित तरूणांच्या
हत्यांच्या विरोधात नॉट इन माई नेम या संकल्पनेखाली निदर्शने करण्यात आली होती.हा
हल्ला झाल्यानंतर काही लोकांनी लिहायला सूरूवात केली की,आता
नॉट इन माई नेम वाले कुठे गेले आहेत?आता अमरनाथ मध्ये हिंदू
लोक मारले गेले आहेत.आता ही लोक निदर्शने करतील का?या
लिहिणा-यात भाजपचे नेता आणि राष्ट्रीय प्रवक्ता जीवीएल नरसिम्हाराव ही सहभागी
झाले.त्यांनी ट्विट केले की,अमरनाथ हल्याचा नॉट इन माय नेम
वाले विरोध करत आहेत की,ते केवळ जुनैद,अखलाक
आणि पहलू खान सारख्यांच्या हत्येच्या विरोधात निदर्शने करतात.त्यांची निदर्शने शिव
भक्तांसाठी नाहीत का?एकीकडे या हल्ल्याची निंदा होत असताना
आता परनिंदा होवू लागली आहे.जमावाने केलेल्या हत्यांच्या विरोधात झालेल्या नॉट ईन
माय नेम निदर्शनाला लक्ष करण्याचे काम हे बुद्धीजीवी करत होते.या लोकांसमोर ही
अडचण होती की,त्यांना स्वत: या हल्ल्याच्या विरोधात निदर्शने
करणे भाग झाले असते तर त्यांना आपल्याच पंसंदीच्या सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
करावी लागली असती म्हणून ते नॉट इन माय नेम वाल्यांना केवळ टार्गेट करत नव्हते तर त्यांच्याकडून
अपेक्षा व्यक्त करत होते की,त्यांनी रस्त्यावर उतरावे आणि या
हल्ल्याच्या विरोधात निदर्शने करावीत.
या प्रकारावरून लक्षात येते
की,अमरनाथ हल्ल्यावरून काश्मीर नीती,तेथील आव्हाने,अपयश यावर प्रश्नचिन्ह उभा केले गेले
नाहीत,सुरक्षेत झालेल्या चूकीवर प्रश्नचिन्ह उभा केले गेले
नाहीत,न कुणाचा राजीनामा या संदर्भात मागितला गेला.फक्त ही लोक बोलत होती नॉट इन माय नेम वाल्यांबद्दल. नॉट इन माय नेम या
नावाखाली दलित आणि अल्पसंख्यांकांची जमावाने केलेल्या हत्यांच्या विरोधात दिल्लीसह
अनेक मोठया शहरात विरोधी प्रदर्शने करण्यात आली होती.विरोधकांनी नॉट इन माय नेम
एका ठराविक वर्गासाठीच आहे का?आता कुठे आहात त्यावेळी बोललात,आता बोला,अशी टिका करायला सूरूवात केली.एकीकडे आपली
जबाबदारी नाकारून उलट दूस-यांवर प्रश्नचिन्ह उभा करण्याचा हा प्रकार ही चालाखी
आहे.या लोकांना हे विचारावे लागेल की,ज्या वेळी काश्मीर
मध्ये पोलिस मारले जातात तेंव्हा ही लोक तिथे प्रदर्शन करण्यासाठी गेली होती का?मग ही लोक नॉट इन माय नेम वाल्यांनाच का शोधत होती?या
लोकांच्या टिकेनंतर नॉट इन माय नेमच्या आयोजकांनी ११ जुलैला संध्याकाळी दिल्लीच्या
जंतरमंतरवर अमरनाथ हल्ल्याच्या विरोधात प्रदर्शन करण्यासाठी जमा होण्याचे आव्हान
केले व नंतर ठरल्याप्रमाणे विरोधी प्रदर्शनही केले.या लोकांनी सांगितले की,आम्ही कुणाच्या दबावाखाली येथे जमा झालो नाहीत तर स्वत:च्या आत्म्याच्या
दबावाखाली जमा झालो आहोत.आम्ही हर प्रकारच्या हिंसेच्या विरोधात आहोत.नॉट इन माय
नेमच्या कार्यकर्त्यांवर टिका करणा-यांना हे लक्षात ठेवायला हव की,दहशतवादाला कुठलाच धर्म नसतो.
-सुरेश मंत्री,धारूर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा