मुख्य सामग्रीवर वगळा

मोबाईलचे युग




त्यावेळी मी महाविद्यालयात शिकत होतो. मोबाईलचे दूरसंचार क्षेत्रात नुकतेच पदार्पण झाले होते. क्वचितच कुणाच्यातरी हातामध्ये नोकियाचा मोठा मोबाईल हॅन्डसेट दिसायचा. लोकांना त्या कडे बघून कुतुहल वाटायचे. त्याकाळी फक्त कॉल करण्याचे नाही तर कॉल आला तरी कमीत-कमी एका कॉल मागे जवळपास ८ रुपये मोजावे लागायचे. असं वाटायच की फोन नाही बिल येत आहे.त्यामुळे आत्ता सारख कोणी मोबाईलवर जास्त वेळ बोलत नसे, फक्त कामापूरतेच थोडक्यात बोलत असत.साहजिकच मोबाईल खूप महागडे आणि कॉलचे दर ही खूप असल्याने याचा वापर करणे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे होते.

कुणाकडे मोबाईल असणे हे त्याकाळी खूप प्रतिष्ठेचे लक्षण समजले जायचे. कुणी जर संपर्कासाठी आपला मोबाईल नंबर देवू केला तर लोकांच्या भुवया उंचवायच्या. आज स्थिती अशी आहे की, लोक आपला मोबाईल नंबर व्हिजिटींग कार्डवर टाकून वाटत आहेत. आज मोबाईलवर मोठ-मोठे लोक सहज उपलब्ध होतात, जसे की ते आपल्या चोविस तास सेवेत आहेत. यात अंतर एवढेच आहे की, यापैकी काही लोक ज्यांच्याकडे त्यांचे काम आहे, त्यांचेच फोन उचलतात आणि त्यांच्याकडे ज्यांचे काम आहे त्यांचे फोन उचलत नाहीत. काहीजण तर फोनच उचलत नाहीत जणू ते कामात खूप व्यस्त आहेत. पूर्वीच्या मोबाईलचा उपयोग फक्त कॉल घेणे आणि करणे एवढाच मर्यादित होता मात्र आता मोबाईल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर क्रांती झाल्याने त्याचा उपयोग एवढाच मर्यादित राहिलेला नाही. आजचा मोबाईल अनेक सुविधांनी युक्त आहे. आज मोबाईल मध्ये कॅलक्युलेटर, घडी, अर्लाम, टॉर्च, कॅमेरा, कॅलेंडर, रेडियो या सर्व गोष्टी असल्याने यांना वेगळ्याने ठेवण्याची गरज नाही. ईमेल, फेसबुक, ट्विटर या गोष्टी पूर्वी कॉम्प्युटर, लॅपटॉप वा आयपॅडवर दिसायच्या त्या आता मोबाईलवरच उपलब्ध झाल्या आहेत. मोबाईलवरिल इंटरनेटच्या सोईमुळे जग जणू आता खूप छोट झाल आहे.

मोबाईल आल्यानंतर आता डोक्याने काम करणे बंद झाले आहे.पूर्वी कुणाचाही लॅंडलाईन नंबर मुखपाठ असायचा, आता एकही मोबाईल नंबर लक्षात राहत नाही. सर्वांचे मोबाईल नंबर डायरीत लिहिण्याऐवजी ते मोबाईल मध्येच सहज सेव्ह होतात आणि सहजरित्या शोधताही येतात. मोबाईल अनेक ठिकाणी आपल्याला आपला अवमान होण्यापासून वाचवण्याचे काम करतो. आपण एखाद्या नातेवाईकाच्या किंवा मित्राच्या सभारंभात गेलो आहोत आणि तिथे आपली कुणी दखल घेतली नाही वा नाही कुणी गप्पागोष्टी करण्यासाठी उपलब्ध आहे, अशा स्थितीत आपण एखाद्या कोण्यात जावून कुणालातरी मोबाईलवर बोलू लागतो .खर तर आपण फोनवर बोलण्याचे नाटक करित असतो वा बळजबरीने स्वत:ला व्यस्त दाखवण्याचा प्रयत्न करित असतो.

मोबाईलमुळे एक किमयाही आपल्याला साधता आली आहे. जी गोष्ट आपल्याला समोरासमोर वा फोनवर बोलण्यासाठी भिती वाटते ती समोरच्याला न रूचणारी किंवा अप्रिय वाटणारी गोष्ट आपण एसएमएस द्वारे सहज पाठवून देतो. एवढच नाही तर कुणाला बोलवायचे नसेल तर आपण संबंधित व्यक्तीला लक्षात येणार नाही असा छोटासा मिस्ड कॉल देतो जेणेकरून आपल्याला नंतर म्हणता येईल की, मी तर आपल्याला आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता मात्र आपणच समोरून प्रतिसाद दिला नाही. आता तर एसएमएसची जागा व्हाटसअ‍ॅपने घेतली आहे. व्हाटसअ‍ॅपद्वारे फक्त शाब्दीक माहितीच नाही तर मल्टीमीडिया मेसेज पाठवता येवू लागली आहेत. व्हाट्सअ‍ॅपमुळे आता लोकांचे फोनवरही बोलणे कमी झाले आहे. भाऊ-बहिण, मुले आपल्या आई-वडिलांना व्हाट्सअ‍ॅप मेसेज पाठवून त्यांची खुशाली विचारण्याची औपचारिकता निभावत आहेत. व्हाट्सअ‍ॅपवर तासनतास चॅटींग करणारी लोक प्रत्यक्षात भेट झाल्यावर मात्र एकमेकांना जास्त बोलत नाहीत जणू आपली जास्त जवळीकता नाही.

मोबाईलच्या साह्याने आज सामान्य माणुस फेसबुकवर स्वत:चा फोटो टाकून स्वत:ला नेता किंवा सेलीब्रेटी बनवण्याचा प्रयत्न करित आहे. भलेही या फोटोला कुणी पाहो वा न पाहो, स्वत:च बघून खुश व्हायचे. आज मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलींग आणि अनेक सुविधा आल्याने आपण दूर विदेशात राहणा-या आपल्या नातेवाईकांना, मित्रांना कमी खर्चात बोलूही शकतो आणि प्रत्यक्ष पाहुही शकतो. आता मोबाईल हॅन्डसेटच्या किंमती आणि कॉलींगचे दर एवढे कमी झाले आहेत की, अगदी गरीबाहून गरीब माणुस मोबाईलचा वापर आणि त्याद्वारे कॉल करत आहे. मोबाईलच्या या काळात लोक लँडलाईन फोनला विसरत चालले आहेत.

आज मोबाईल जेवढा उपयोगी आहे तेवढेच हानिकारकही झाले आहेत. आज जणू माणसाच्या चारही बाजुंनी कॅमेरे लागले आहेत. कोण तुमचे काय रेकॉर्ड करित आहे स्वत: आपल्यालाच माहित पडत नाही. कधी मी एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर दिसत की, सर्व कुटुंब एकत्र मिळून जेवण करण्यासाठी आल आहे. हे पाहून खूप आनंद वाटतो की, एकत्र कुटुंब पद्धत आजही जीवंत आहे. मात्र थोडया वेळाने त्यांच्या टेबलकडे पाहिल तर दिसत की, मुलगा-सुन, मुलगा-मुलगी, आई-वडिल सर्व जण आपआपल्या मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, आणि कुणी कुणाशी काहीच बोलत नाहीय. एकाच टेबलवर बसल्यानंतरही कुणी कुणाकडे बघतही नाही. याला मोबाईल एकटा जबाबदार नाही. लोक आजकाल एक-दूस-यांपासून नजर चोरण्यासाठी मोबाईलचा वापर करित आहेत.

प्रश्न हा आहे की, जीवनात सुविधा कशासाठी आहेत, जर जीवनात त्यामुळे आनंदच नसेल तर.एक-एका व्यक्तीकडे आज दोन-दोन मोबाईल आहेत. लहान मुलांमध्ये याच्या अधिक वापराने बहिरेपणा निर्माण होत आहे तसेच डोळ्यावर जाड भिंगाचे चष्मे लागत आहेत. मोबाईल टावर मधून निघणा-या तरंगामुळे पक्षांवर आणि मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. पुर्वीच्या मोबाईलमध्ये फक्त बॅक कॅमेरा होता आज फ्रंट कॅमेराही आल्याने सेल्फी नावाची नविन बिमारी आली आहे. एकीकडे देशातील तरूणांचा महत्वपूर्ण वेळ या सेल्फीमध्ये वाया जात असताना धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. नागपूरजवळील वेणा धरणात काही तरुण पर्यटनासाठी गेले होते. तेथे व्हिडिओ सेल्फी काढण्याच्या नादात यापैकी एक-दोन नव्हे तब्बल आठ तरूण पाण्यात बुडून मरण पावले. देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान आपली सेल्फी घेवून फेसबुकवर अपडेट राहण्याचा प्रयत्न करित आहेत अशात तरूण वर्ग तरी यात कसा मागे राहिल. या तरुणांनी फेसबुकवर अपलोड केलेली लाईव्ह व्हिडिओ सेल्फी ही त्यांच्या जीवनातील अंतीम सेल्फी ठरली. दूसरीकडे अनेक दूरसंचार कंपन्यांनी इंटरनेट मोफत दिल्यासारख दयायला सुरूवात केली आहे. अनेक शालेय आणि महाविद्यालयीन तरूणांच्या हातात आज महागडे मोबाईल फोन आहेत. सोबतीला अमर्याद इंटरनेटची सोय असल्याने ते यात तासनतास मशगुल असतात. यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दूर्लक्ष झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या धावपळीच्याच्या जीवनात लोक एवढे व्यस्त आहेत की, मोबाईल त्यांची एक अत्यावश्यक बाब बनली आहे. चूकुन जरी मोबाईल घरी विसरला तरी खाली-खाली वाटु लागत. हातात मोबाईल नसेल तर काहीतरी चुकल्यासारख वाटत. एखादे तंत्रज्ञान स्वत: वाईट किंवा चांगले नसते. आपण त्याचा वापर कसा करतो यावर हे अवलंबून आहे. मोबाईलचे हे वेड आपल्याला पूढे कुठे घेवून जाईल ? सांगता येण अशक्य आहे. 
-सुरेश मंत्री.    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...