हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना।
आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोऊ जाना।।
संत कबीर म्हणतात, हिंदू मानतात की राम सर्वोच्च
आहे, तर मुस्लिम मानतात की रहमान सर्वोच्च आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण
झाले. दोघांनाही गुपित माहीत किंवा समजलेले नाही. धर्माच्या नावावर संघर्ष सुरू
आहे, पण कोणताही धर्म संघर्ष शिकवत नाही, कोणताही धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही, कोणताही धर्म हिंसाचार, जुलूम, भेदभाव आणि एकमेकांविरुद्ध उच्च-नीच यांना प्रोत्साहन देत नाही. परंतु
एखादी व्यक्ती आपल्या धर्माला सर्वोच्च बनवण्यासाठी अनैतिक कृत्यांचा अवलंब करते
आणि व्यर्थ कृत्यांमध्ये आपले जीवन संपवते. त्यामुळे त्याच्या आयुष्यात प्रगती होत
नाही किंवा समाजासाठी काही उपयोग होत नाही. ‘क्या बहरा हुवा खुदाय ’ म्हणत
कबीरांनी समाजाला सांगितले की, देव किंवा अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी बाह्य
दिखाव्याची काय गरज आहे? देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्याने प्रार्थना करण्याची
गरज नाही कारण अल्लाह किंवा देव बहिरे नाही. परमेश्वर सर्व ऐकतो, सर्व पाहतो.
आपल्या अंतर्मनात काय चालले आहे तेही
त्याला माहीत असते. हिंदू आणि मुस्लिम सनातन्यांनी जिवंतपणी कबीरांना कमालीचा
विरोध केला. पण कबीरांना या दोन्ही समाजातील सर्वसामान्य माणूस आपले मानत होता.
खरेतर धर्म, कर्मकांडे वगैरे बाबी त्याज्य मानणाऱ्या कबीरांना हिंदू 'हिंदु' मानत आणि मुसलमान 'मुस्लीम' मानत.
त्यामुळेच कबीरांच्या मृत्यूनंतर त्यांचे 'दहन' करायचे की 'दफन 'याबाबत मोठा वाद झाला.
आजच्या बिघडलेल्या (बिघडवलेल्या) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली
आहेत. त्यातून सावरण्यासाठी संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज
आहे.
गेल्या काही
वर्षांत भारतात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना वारंवार घडायला लागल्या आहेत. आजकाल
इथे सार्वजनिक जीवनात जे काही घडत आहे, ते प्रदर्शनासाठी किंवा सूडासाठी घडत आहे.
इथे इतरांना चिडवण्यासाठी पूजा केली जाते, मिरवणुकीत इतर समाजाला शिवीगाळ केली
जाते. अदृश्याची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण केले जाते, मात्र येथे
भीती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. अजानला विरोध करण्यासाठी लाऊडस्पीकरवर
हनुमान चालीसा वाजवली जाते. एकेकाळी देवाला प्रेमाचे दुसरे नाव दिले जात होते, देव
प्रेमाला पर्याय होता, तो खूनाच्या देवामध्ये बदलला जात आहे. संशय, संशय, द्वेष,
खून ही या नव्या समाजाची मूल्ये होत आहेत. भारतीयांच्या कानावर आता सतत धार्मिक
तेढ वाढवणारी विधानं पडत असतात. दोन्ही बाजूंनी द्वेषाचा मारा होत असतो. सोशल
मीडिया आणि टीव्ही चॅनल्सवरही अशा प्रकारच्या वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते, अगदी
लहानशा राजकारण्याने असं विधान केलं असलं तरी त्या विधानांच्या हेडलाईन्स बनवल्या
जातात.
आधी अशा प्रकारची
विधान निवडणुकांच्या काळात व्हायची. पण आता सोशल मीडियामुळे राजकारण्यांना कळून
चुकलं आहे की एका राज्यात काही धार्मिक तेढ वाढवणारी विधानं केली की दुसऱ्या
राज्यात त्याला मोठं करून लगेचच राजकीय फायदा मिळवता येऊ शकतो. भारतात दोन किंवा
अधिक समुदायांमध्ये धार्मिक तेढ वाढवणं, तशा प्रकारची वक्तव्यं किंवा कृती करणं
तसंच कोणत्याही धर्माचा अपमान होईल अशा कृती मुद्दाम करणं कायद्याने गुन्हा आहे. धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांचा मुद्दा अनेकदा कोर्टासमोर आलाय. पण
न्यायव्यवस्था भाषण स्वातंत्र्यावर बंधनं घालू इच्छित नाही. सुप्रीम कोर्टाने २०१४
साली एका याचिकेवर सुनावणी करताना द्वेष पसरवणा-या विधानांच्या घटना कमी व्हाव्यात
म्हणून काही निर्देश दिले होते. कोर्टाने असंही म्हटलं की, अशी विधानं लोकांवर
वाईट परिणाम करू शकतात. पण सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या कक्षेपलिकडे
जाण्यास कोर्टाने नकार दिला. जोपर्यंत अशी विधानं करणाऱ्या लोकांना शिक्षा होणार
नाही तोपर्यंत इतर लोकांना जरब बसणार नाही. अशा प्रकारची विधान सतत होतात अशा
वातावरणात लोकांच्या मनात असुरक्षितता आणि भीती निर्माण होते. ते रोजच्या
आयुष्यातले सामाजिक संबंध टिकवू शकत नाही, संवाद साधू शकत नाही, आपली व्यावसायिक
कामं करू शकत नाहीत.
-सुरेश मंत्री.
-
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा