श्वासात
अडकला पैसा अन पैशात अडकला श्वास;
श्वासाने
सार्थक पैसा की पैशाने चाले श्वास ?
पैसा
ही संकल्पना आहे. पण कोणतीही संकल्पना फार काळ आणि वारंवार वापरली गेली तर
ती वस्तुस्थिती वाटायला लागते.
अर्थात त्या कल्पनेचा उपयोग आहे पण ती सत्य वाटल्यामुळे. पैसा हे वस्तूविनिमयाचं माध्यम आहे. कोणत्याही वस्तूचे
मूल्यनिर्धारण करण्याचे ते मापदंड आहे. वेगवेगळ्या काळात तिची रुपे बदलत गेली
आहेत. देशकाल परिस्थितीस अनुसरून वस्तूंची निवड मानवाने चलन म्हणून केल्याचे दिसते. शिकारी अवस्थेत प्राण्यांच्या कातड्याचा उपयोग चलन म्हणून होऊ लागला. ही अवस्था जाऊन जेव्हा मनुष्य गुरेढोरे बाळगू लागला, तेव्हा गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या या जनावरांचा उपयोग चलन म्हणून होऊ लागला. कृषियुग सुरू झाले, तेव्हा धान्य चलन म्हणून वापरात आले. समुद्रकिनाऱ्यावर वस्ती करून राहिलेले लोक शंख, शिंपले, मगरीचे दात, सुके मासे चलन म्हणून वापरीत; तर थंड प्रदेशात राहणारी जमात लोकरीचा विनिमयासाठी उपयोग करी. इथिओपियामधील लोक मिठाचे खडे पैसे म्हणून वापरीत. पॅसिफिक बेटांवरील लोक पंचेवीस शेर वजनाच्या प्रचंड दगडापासून पक्ष्याच्या पिसापर्यंत विविध वस्तू विनिमयासाठी वापरत असल्याचे आढळते. अब्राहमने इजिप्तकडून येताना गुरेढोरे, सोने व चांदी ह्या स्वरूपात प्रचंड संपत्ती आणली, असा ओल्ड टेस्टामेंट मध्ये उल्लेख आहे. सीलोनमधील लोक तर हत्तीचा उपयोग चलन म्हणून काही काळ करीत असल्याची माहिती मिळते. आफ्रिका खंडातील अनेक देशांत चलनासाठी कवड्या वा कवड्यांच्या माळा वापरीत असत. फळे, अंडी आदी नाशवंत वस्तू चलन म्हणून उपयोगात आणणे गैरसोयीचे होते आणि जनावरांचा संचय करून ठेवणे अडीअडचणीचे व खर्चाचे होते. गेल्या काही दशकात ज्याच्याकडे रोकड रक्कम जी नोटांच्या स्वरुपात असे ती जास्त असेल तो श्रीमंत ठरत असे. आज ज्याच्याकडे डिजीटल माध्यमातील पैसा आहे. तो माणूस श्रीमंत आहे, स्मार्ट आहे. येणाऱ्या काळात त्याची जागा कदाचित क्रिप्टो करंसी घेईल. काळानुरुप पैसा ही संकल्पना बदलत जाते. त्याची नावेसुध्दा बदलत जातात.
पैसा नसेल तर श्वास बंद पडेल असं वाटतं ते खरं नाही. पैसा म्हणजे सुख, यश असे म्हणता येईल का ? आपल्या गरजा भागल्यानंतर जी मन:स्थिती निर्माण होते, त्यातून यशाची भावना किंवा सुखाची भावना निर्माण होते. मात्र, जास्त पैसे मिळविले म्हणून यशस्वी झालो, असं म्हणता येईल का ? यश पैशानं मोजता येईल का ? उद्दिष्टपूर्ती, कार्यसिद्धी हे यशाचे मापदंड असतील, तर पैसा हा फार तर त्याचे साधन असेल; पण पैसा हे साध्य कधीच नसते. कधी कधी आपण पैशाला साध्य समजून बसतो आणि मग सुख आणि यश बाजूला ठेवून या भ्रामक पैशाच्या पाठीमागे धावून दु:खी होत राहतो.
आपल्याकडे कितीही पैसा असला तरी काही गोष्टी आपण त्या पैशाने खरेदी करू शकत नाही. जस आईची माया, लहान मुलाचे हसणे, निसर्ग, पाऊस, वारा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम, नि:स्वार्थी प्रेमाला पैशाची जोड नाही ! आपला आनंद कशात आहे, ते शोधा. जगण्यास पैसा, अडका लागतो खरा पण ते सर्वस्व नाही. जगातील प्रत्येक व्यक्तीला पैसा लागत आहे, असे वाटते खरे. परंतु, काही लोक आनंदी राहायला प्राधान्य देतात. तुम्हाला ठरवायचं आहे की धन मोठे की स्वत:चा आनंद. काही लोक सहमत नसतील ही खरे या विचारांशी. परंतु, पैशाची परिस्थिती अशीच आहे. जगायला पैसा आणि पैशाने जग चालले आहे, पण कोणत्याही व्यक्तीने आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले आहे, त्यात धनाची काय भूमिका आहे हे ठरवावे.
स्वच्छंद जगायला अमाप पैसा हवा ही प्रत्येकाची कल्पना असण्यामागे कारण असंय की प्रत्येकानं आपल्याकडे असलेल्या पैशाचं `रेव्हेन्यू आणि कॅपिटल' असं विभाजन केलंय. तुम्ही कॉमर्सचे नसाल तर ही कल्पना तुम्हाला माहीती नसेल पण तुम्ही ती वापरताय निश्चित ! कॅपिटल म्हणजे ज्याला धक्का लागू नये आणि ज्याच्यातून पैसा निर्माण व्हावा असं तुम्हाला वाटतं तो पैसा आणि रेव्हेन्यू म्हणजे जो तुम्ही सहज खर्च करू शकता, जो रोजच्याला लागतो तो पैसा. प्रत्येकाला जेव्हा आपल्याकडे अमाप पैसा हवा असं वाटतं तेव्हा त्याला असं वाटतं की आपल्याकडे इतका `भांडवली पैसा' हवा की त्यातून मिळणार्या पैशातून आपली शेवट पर्यंत उपजीविका चालावी ! याच्यासाठी एकतर राजघराण्यात जन्म घ्यावा लागतो किंवा एकदम मोठी लॉटरी वगैरे लागायला लागते, रोजच्या जीवनात हे शक्य नाही. आपल्या रोजच्या जगण्यातून, सरळ मार्गानं, तुमच्या मनात असलेल्या भांडवली रकमेची तरतूद व्हायला अनेक वर्ष लागतील आणि मजा म्हणजे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहचाल तेव्हा तुमची भांडवली रकमेची फिगर तुमच्या जमा झालेल्या रकमेच्या पुढे गेलेली असेल ! आणि हे केवळ या जन्मी नाही तर जन्मोजन्मी असंच चालू राहील ! मग काय करायला हवं ? तर अत्यंत फंडामेंटल गोष्ट म्हणजे पैशाकडे नुसतं पैसा म्हणून बघता यायला हवं, त्याचं कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे वर्गीकरण करणं सोडायला हवं. हे अगदी साधं, योग्य आणि सोपं आहे पण इथे भलेभले हरतात. आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी करताना पैशाची चणचण भासू नये, एवढे पैसे प्रत्येकाने कमावले पाहिजेत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, प्रत्येकाने किती पैसा कमावला पाहिजे ? याचे काही ठोस उत्तर नाही; कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या जगण्याच्या पध्दतीत फरक आहे. जीवनशैलीत फरक आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणात पैसा लागत असतो. तारुण्यात आयुष्य मोठ्या प्रमाणात व भरभरुन जगले पाहिजे. मौजमस्ती किंवा इतर गोष्टींचा आनंद घेतला पाहिजे. तारुण्यातली सगळीच्या सगळे उमेदीची वर्षे केवळ पैसा गोळा करण्यात वाया घालवली, तर म्हातारपणी तो मिळवलेला पैसा उपभोगण्याची क्षमता उरेलच असे नाही. तारुण्याची बहारदार वर्षे सदाबहार जगण्यात जी मजा आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. आनंदाने जगण्याच्या संकल्पना म्हणजे मोठी साहसे करणे, जनमानसात आपल्या कर्तृत्वावाचा ठसा उमटवणे, यशाच्या शिखरावर जाणे, पर्यटनाचा आनंद लुटणे या गोष्टी आहेत. आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टी, चारित्र्याची बदनामी करणाऱ्या गोष्टी मिळवणे म्हणजे सदाबहार जगणे नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे. या सगळ्या गोष्टी पैशाने साध्य होतात. पैशाबद्दल या किमान अपेक्षा प्रत्येकाच्या असतात; याहून मोठ्या सुध्दा अपेक्षा असाव्यात.
पैशाबद्दल अपेक्षा कितीही असू शकतात, मात्र प्रत्यक्ष हातात येणारा पैसा आपल्या अपेक्षेएवढा असतोच असे नाही. कमावलेल्या पैशाचे योग्य नियोजन करुन आपल्याला आपल्या अपेक्षा पूर्ण करता येतात. कमी पडत असलेले पैसे उभारणीचे तंत्र अवगत करुन घ्यायला पाहिजे. पैसे उभारताना ज्यांनी मदत केली त्यांचे पैसे वेळेवर परत करण्याची कला आपल्याला साध्य झाली पाहिजे. तरच अपेक्षेइतके पैसे मिळवता येतील. स्वप्न व सत्य यात अंतर राहणार नाही. प्रत्येक वस्तू खरेदी करताना आपली गरज आहे का ? आपण तिचा वापर करणारा आहोत का ? उपभोग घेणार आहोत का ? या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे आली तरच खरेदी करा. अन्यथा नको तिथे तो पैसा अडकून पडतो. आपण आयुष्यात अशा कितीतरी वस्तू व सेवा खरेदी केलेल्या असतात, त्याचा वापर आपण कधीच केलेला नसतो. कधीही न घातलेले कपड्याचे किती जोड कपाटात आहेत ? त्यावर नजर टाका. नसतील तर उत्तम आहे, मात्र असतील तर थोडासा विचार करण्याची गरज आहे. फक्त कपडेच नाही तर इतर अजून गोष्टींचा विचार करा, ज्यांचा वापर केलेला नाही.
माणसाच्या गरजा त्याच्या उत्पन्नानुसार वाढत नाहीत. पाच हजार उत्पन्न असताना जेवढे अन्न लागत होते तेवढेच अन्न पन्नास हजार उत्पन्न झाल्यावर सुध्दा लागणार आहे. पाच हजाराचे उत्पन्न पन्नास हजार झाल्यावर दहापट खाणारा माणूस आजपर्यंत माझ्या निदर्शनास आलेला नाही. आरामदायी वस्तूंच्या खरेदीच्या प्रमाणात वाढ होते, मात्र त्या वस्तू खरेदी करताना सुध्दा त्याचा वापर करणार आहोत का ? आपल्याला त्याची गरज आहे का ? त्या उपभोग घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का ? या तीन प्रश्नांची उत्तरे सकारात्मक आली तरच खरेदी करा. खिशात पैसा म्हणजे जीवनाला आधार, असा काहींचा समज असतो. पैसा असल्यानं आता माणसांच्या आधाराची गरज नाही, असे समजून आपण सुरक्षित असल्याचं त्यांना वाटू लागतं. ही मंडळी स्वत:च्या वर्तमानासाठी, म्हातारपणासाठी, इतकेच नव्हे तर पुढील पिढ्यांसाठीही पैशांची तरतूद करू लागतात. पैसा आणि सुरक्षितता यांचा संबंध अशा प्रकारे जोडल्याने ते सतत पैशाच्या मागे धावू लागतात. यामुळे पैसाच त्यांचे जीवन नियंत्रित करू लागतो आणि ही मंडळी पैशांच्या साह्याने सारे काही विकत घेण्याचा प्रयत्न करतात; इतरांच्या भावनांचा विचार न करता त्यांचं जीवनही नियंत्रित करू लागतात. मात्र, अशांना पैसा सुख देत नाही. म्हणूनच अनेक धनाढ्य मंडळी दु:खी, कष्टी असल्याचं आपल्याला दिसतं. संतोष, तृप्ती, समाधान हे इतरांसाठी काहीतरी केल्यानं मिळत असतं. आपल्याकडं पैसा असेल आणि इतरांना अडचणीच्या वेळी त्याची मदत केल्यास निश्चितच समाधान मिळतं. इतरांना मदत करावी असं वाटणारी माणसं लोभी नसतात. त्यांना या प्रकारे इतरांविषयी वाटणारे प्रेम, सलोखा, आस्था ही मानवी जीवनाची पूर्णत्वाची अवस्था आहे. म्हणूनच पैशानं ती तयार होत नाही.
मात्र, हेही लक्षात घ्यायला हवे, की पैशाचा त्यागही करून चालत नाही. ते दुसरं टोक झालं. पैसा आला पाहिजे. आणि तो नीट वापरला पाहिजे. पैशाचा योग्य वापर करता आला तर पैसाही मोठं सुख देऊ शकतो. मोठं समाधान देऊ शकतो. टोकाचा त्यागही नको आणि टोकाचा लोभही नको, यामध्ये तारतम्य ठेवून जर मध्यम मार्ग स्वीकारला तर पैसा खूप काही करू शकतो. पैसा हे साधन आहे, हे आपल्याला समजायला हवं. समाधान, प्रेम, यश ही उद्दिष्टं आहेत. पैशाच्या साधनाद्वारे आपण आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहचायला हवं. आपण पैशाचे गुलाम होता कामा नये; पैशाला आपला गुलाम करायला हवा. 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी' असं संत तुकाराम महाराजांनी म्हणूनच म्हटलं आहे.
खरं तर पैशानं सगळ्याच गोष्टी साध्य होतात असे नाही. मात्र, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी साध्य होतात. एखाद्या निर्जन बेटावर समजा आपण आहोत. तिथं आपल्याला भरपूर पैसे दिले गेले आहे; परंतु तिथं खाण्याचे पदार्थ नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही, मानवी वस्ती नाही आणि अन्य भौतिक सुविधा नाहीत. अशा ठिकाणी आपल्याकडील पैशानं आपण काय करू शकतो ? काहीच नाही. तिथं पैशाला काहीही मूल्य नाही. पैशाची ही मर्यादा ओळखणं अतिशय आवश्यक आहे. जगण्यासाठी क्षणोक्षणी पैशाची गरज भासत आहे, परंतु कमवलेला पैसा आणि कष्टाचे धन यातील अंतर जाणता आले पाहिजे. माणूस असा एकच या पृथ्वीतलावर आहे की जो पैशाशिवाय जगू शकत नाही. या जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भूक आहे हे विसरून चालणार नाही. तेवढेच घ्यावे, जेवढे हातात मावेल, कधी दान देऊन सुद्धा पहावे, पैशाचे दान न करता गरजा भागविणा-या वस्तू, अन्न, वस्त्र इतर गोष्टी देऊन पहावे. मनाला जो आनंद मिळतो तो पैसा, धन कमविण्यासाठी प्रेरणा ठरेल. प्रत्येकाची अशी समजूत आहे की पैसा आहे म्हणून खायला मिळतंय आणि खायला आहे म्हणून श्वास चालू आहे ! हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि अत्यंत खोलवर रुजलेल्या या कल्पनेमुळे भीती निर्माण झालीये. श्वास चालू आहे म्हणून आपण पैसे मिळवू शकतो, श्वास महत्त्वाचा आहे पैसा दुय्यम आहे. हा गैरसमज दूर होता क्षणी पैशात श्वास अडकणं आणि श्वासात पैसा अडकणं पूर्णपणे थांबतं. पैसा आणि श्वास ही खोलवर बसलेली गाठ सुटते ! असं जगून तर बघा पैसा कधी कमी पडतंच नाही कारण तुम्ही आहे तो प्रसंग आणि आहे तो पैसा याची सांगड घालत आज मध्ये जगायला लागता, उद्या कधी येतच नाही ! उद्या ही कल्पना आहे, उद्या ही भीती आहे आणि त्या भितीनंच पैसा प्रथम आणि आपण दुय्यम झालोत !
-सुरेश मंत्री.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा