ग्रामीण भागातून आलेल्या
अनेक कलाकारांनी स्वत:च्या अभिनयाच्या बळावर आज चित्रपटसृष्टीत स्वत:च वेगळं स्थान
निर्माण केल आहे. मकरंद अनासपुरे, सदाशिव अमरापुरकर, संजय कुलकर्णी, संदीप पाठक, सुधिर निकम,
प्रमोद रामदासी, रवींद्र सोळंके, विजय
अंजान हे कलाकार ग्रामीण भागातूनच आलेले. ग्रामीण भागात चित्रपट, मालिकांसाठी अनेक चांगले विषय मिळत असल्याने दिग्दर्शक देखील ग्रामीण बाज असलेल्या विषयांना हात घालताना दिसत आहेत.
असे विषय या क्षेत्रातील जाणकार आणि प्रेक्षकांनाही आवडत आहेत. विषय ग्रामीण असल्याने
दिग्दर्शकही याच भागातील कलाकारांना संधी देत
आहेत. अशा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी हे कलाकार सर्वस्व पणाला लावून आपली
कलाकारी दाखवतात. असाच एक कलाकार आपले पाय मराठी
चित्रपटसृष्टीत रुजवताना पाहायला मिळत आहे. रवींद्र ढगे (धानोरकर) हे त्याच नाव. बीड
जिल्ह्यातील धानोरा (खुर्द) या छोट्याश्या गावातून आलेल्या या तरूण कलाकारानं
‘प्रेम लागी जीवा’, ‘जिद्दारी’ या मराठी चित्रपटांमध्ये तसेच
अनेक मालिकांमध्ये आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडली आहे.
त्याचा ‘प्रेम लागी जीवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात
त्याने महत्वाची भूमिका निभावली आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट दमदार वाटचाल करीत
असून या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. मुळ शेतकरी
असलेल्या या उदयोन्मुख कलाकाराशी केलेली बातचित.
प्रश्न- आत्तापर्यंत कुठले प्रोजेक्टस केलेस?
झोंबिवली,
जिद्दारी, प्रेम लागी जीवा हे मराठी चित्रपट व अगं बाई सासु
बाई, काय घडलं त्या रात्री, स्वराज्य
जननी जिजामाता, सहकुटुंब सहपरिवार,
बाळू मामाच्या नावान चांग भलं, नवनाथ या मालिकांमध्ये मी
भूमिका केल्या आहेत.
प्रश्न-
बालपणं कस राहिलं? अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण कसं झाल?
माझा जन्म एका छोट्याश्या शेतकरी
कुटंबात झाला. वडिल सिव्हिल कॉण्ट्रॅक्टर असल्याने माझ बालपण पुण्यात गेलं. बालपणी
चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. बालपणी मित्रमंडळींना जमा करून खेळ स्वरूपात
नाट्यसादरीकरण करायचो. गावाकडे परत आल्यानंतर ८ वीला असताना माझा मित्र सुरेश
जगताप याला नागनाथ कोडे लिखित ‘प्रेमाचे फुल, एकच मुल’ या नाटकाचे
दिग्दर्शन करताना स्त्रीचे पात्र करण्यासाठी कोणी भेटत नव्हते. त्यावेळी मी या
नाटकात त्याच्या आग्रहावरून ‘सरस्वती’ या स्त्री पात्राची भूमिका केली होती. या
नाटकाचे बरेचसे प्रयोग आसपासच्या पंचक्रोशित झाले. अंबाजोगाईला शिक्षण घेत असताना
अनेक पथनाट्यांमध्ये सहभागी होऊन कला सादर केली. नंतर लातुरला असताना ‘आकडा’ या
नाटकात काम केले होते. या नाटकाचे सुद्धा अनेक प्रयोग झाले होते. माजी मुख्यमंत्री
स्व.विलासराव देशमुख यांनी या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पाहुन माझ्या अभिनयाची
प्रशंसा केली होती. येथुनच माझ अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण झालं अस म्हणता येईल.
प्रश्न-
याआधी अभिनयाचे प्रशिक्षण कुठे घेतले होते का?
नाही, मी यापूर्वी अभिनयाचे
कसलेही प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र बालपणापासुन अभिनयाची आवड असल्याने या
क्षेत्राकडे वळलो.
प्रश्न-
जिद्दारी हा तुझा पहिला चित्रपट, तुला यात संधी कशी मिळाली?
दिप्ती शेंदारकर निर्मित ‘जिद्दारी’
या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल शिंदे (होळकर) करित होते. दिप्ती शेंदारकर यांना
ग्रामिण भागातील कलाकारांनाच प्राधान्याने संधी देवून हा चित्रपट तयार करायचा
होता. गणेश उत्सवात गावाकडे सांस्कृतीक कार्यक्रम करित असताना सुधीर माले या
चित्रपट कलाकारांनी मला जिद्दारी या चित्रपटाचे ऑडिशन सुरु असल्याचं सांगितल. मला
अभिनयाची आवड असल्याने मी या चित्रपटाच्या ऑडिशनला गेलो. या ठिकाणी माझ सलेक्शन
झाल. सुरूवातीला १५ दिवस कार्यशाळा घेतल्यानंतर प्रत्यक्षात या चित्रपटाचे शुटींग
सुरू झाले. या चित्रपटात मी मुख्य अभिनेत्रीच्या वडिलांची भूमीका केली होती.
प्रश्न -‘प्रेम लागी जीवा’ या चित्रपटाबद्दल काय सांगशिल? या
चित्रपटातला तुझा अनुभव कसा होता? ‘प्रेम
लागी जीवा’ हा चित्रपट जाती व्यवस्थेवर असुन दिव्यांग व्यक्तीच्या प्रेमकथेवर
आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातही माझी ऑडीशन दिल्यानंतर निवड झाली होती. सध्या
हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून बॉक्स
ऑफीसवर चांगली वाटचाल करीत आहे. या चित्रपटाचे सध्याचे रेटींग ४.० आहे. २२
एप्रीलला रिलीज झालेला हा चित्रपट अजुनही सुरू आहे. कस्तुरी फिल्म एंटरटेन्मेंट
वर्ल्ड प्रस्तुत प्राजक्ता खांडेकर निर्मित हा चित्रपट असून सोमनाथ लोहार यांनी या
चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात वैशाली साबळे,
सोमनाथ लोहार, नागेश थोंटे, मयुरी
नवाते, हास्य कलाकार जॉनी रावत, हर्षद
पठारे, राजेंद्र जाधव, प्राजक्ता
खांडेकर व मी मुख्य भूमीकेत आहे. या चित्रपटात मी मुख्य नायिकेच्या मोठ्या भावाची
अशोक पाटलाची नकारात्मक भूमीका साकारली आहे.
प्रत्येकाने कुटुंबासह पाहावा असा हा मनोरंजनात्मक चित्रपट आहे.
प्रश्न-
शिक्षण किती झाले आहे?
माझे शिक्षण विधी शास्त्र शाखेत
द्वितीय वर्षापर्यंत लातुर येथील दयानंद महाविद्यालयात झाले आहे.
प्रश्न-
सध्या चित्रपटाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत, त्याबद्दल तुला काय वाटत ?
चांगले प्रयोग मराठीत होत आहेत. अनेक
चांगले दिग्दर्शक, लेखक मराठीत आहेत. ते सातत्याने वेगळा विषय
मांडण्याचा प्रयत्न करतात. मला असं वाटत की, मराठी
चित्रपटसृष्टीचा विकास होण्यासाठी सातत्याने नव-नविन प्रयोग होणे गरजेचे आहे. मराठी
चित्रपटांना हिंदी चित्रपटांच्या तुलनेने चित्रपटगृह मिळत नाहीत. त्यामुळे मराठी कलाकारांनी सादर केलेली कला लोकांपर्यंत पोहचत नाही.
जोपर्यंत आपण मराठी भाषा व साहित्यावर प्रेम करणार नाहीत तोपर्यंत मराठी
चित्रपटांचे सुवर्ण दिवस येणार नाहीत. आता हळूहळू प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे वळत
असल्याने मराठी चित्रपटसृष्टीसाठी व नाट्यासाठी येणारे दिवस हे सुवर्ण दिवस नक्कीच
असतील अस मला वाटत.
प्रश्न- सिनेमा,
नाटक की सिरियल?
तिन्ही क्षेत्राचे फायदे-तोटे दोन्ही
आहेत. ठराविक असे काहीच नाही. या तिन्ही क्षेत्रातला मुळ गाभा हा अभिनयच आहे. तिन्ही
क्षेत्रात मला काम करायला आवडेल.
प्रश्न-
या क्षेत्रात येणा-या लोकांना काय सांगशिल?
स्वत:वर विश्वास ठेवा. खरे वागा.
ग्लॅमरच्या मागे धावू नका. फसवणूकीला
बळी पडु नका. या विस्तारलेल्या क्षेत्रात यायचे असेल आणि मोठं व्हायचे असेल तर
पूर्ण अभ्यास करूनच या. यश हे येत-जात राहील पण तुम्ही मेहनतीने काम करत रहा आणि
आपल्या कामात प्रामाणिक रहा.
प्रश्न-
तुझी पुढील वाटचाल कशी आहे?
काही मराठी चित्रपटांचे मी ऑडिशन दिले
असून त्यात सलेक्शन झाले आहे. येणा-या काही दिवसांमध्ये हे चित्रपट चित्रपटगृहात
येतील व मी त्यात वेगवेगळ्या भूमिकांकामध्ये सर्वांना दिसेल. नाटक,
समाजप्रबोधनपर पथनाट्यांमध्ये सुद्धा मी अभिनयाचा प्रवास सुरूच ठेवणार आहे.
प्रश्न-
एक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगा ते एक सिनेअभिनेता कसे वाटते?
सिनेसृष्टीची कसलीही कौटुंबीक
पार्श्वभूमी नसताना चित्रपट निर्मात्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे व अभिनय
कौशल्यामुळे मी या क्षेत्रात आलो. मला या क्षेत्रात यश ही मिळत गेलं. मला रसिक प्रेक्षकांचे
भरभरून प्रेम मिळत आहे. मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी प्रेक्षकांचा ऋणी आहे.
शब्दांकन- सुरेश मंत्री.

मुलाखत खूप छान झाली आहे
उत्तर द्याहटवा