नव साहित्यिकांच्या साहित्यप्रज्ञेचा शोध घेण्याच्या आणि त्यांच्या सृजनशिलतेला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एका नविन साहित्य चळवळीची सुरूवात येत्या ३१ मेला भूम येथून होत आहे. राष्ट्र्माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भूम येथील शंकरराव पाटील महाविद्यालय आणि साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने यादिवशी पहिल्या एकदिवसिय जिल्हास्तरिय साहित्य संमेलनाचे आयोजन शंकरराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील असे नवोदित साहित्यिक ज्यांना अद्याप कुठलेही व्यासपिठ आपले साहित्य सादर करण्यासाठी भेटलेले नाही, त्यांना आपले स्वरचित साहित्य सादरीकरणाची संधी याठिकाणी भेटेलच सोबत या साहित्यिकांना अनुदान स्वरूपात, मोफत स्वरूपात किंवा सवलतीच्या दरात प्रकाशन संस्था उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न साहित्य संघाच्या माध्यमातून केला जाणार आहे. या संमेलनास नवोदित साहित्यिकांचा तसेच रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. पत्रकार व लेखक शंकर खामकर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या संमेलनरूपी रोपट्याचे नजिकच्या काळात वटवृक्षात रूपांतर होईल याचा आम्हा साहित्यिकांना विश्वास आहे.
ख-या अर्थाने मराठी भाषा टिकवायच आणि वाढवायच काम ग्रामीण महाराष्ट्रातच होत आहे. ग्रामीण भागातील या साहित्यिकांनी आणि त्यांच्या साहित्याने आवारातून शिवारापर्यंत येणे गरजेचे आहे. आजकाल तव्यावर हुरडा भाजायची संस्कृती वाढते आहे अशा काळात मराठी भाषेच्या हुरडयाची आगटी ग्रामीण साहित्यिकांनी विझू दिलेली नाही. आजकाल इंटरनेटमुळे लोकांना एकमेकांशी संवाद साधायला वेळ मिळत नाही. अशावेळी ग्रामीण भागातील साहित्यिकांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. या नव साहित्यिकांनी पूढे येवून या ठिकाणी आपले साहित्य मग ती कविता, गझल, कथा, विडबंन अथवा साहित्याचा कोणता प्रकार असो सादर केल्यास रसिक श्रोत्यांची मिळालेली दादच त्यांना प्रोत्साहन देवून जाईल. या नव साहित्यिकांनी सादर केलेल्या साहित्याचे परिक्षण होणार असून पहिल्या तीन उत्कृष्ट कृतींना सन्मान चिन्ह देऊन उपस्थितांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय अनाथ बालकांसाठी काम करणारी व्यक्ती – संस्था, धार्मिक कार्यातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तीस देखील अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
या साहित्य संमेलनाचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत पडवळ तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे विभागीय माहिती व उपसंचालक यशवंत भंडारे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनास चित्रपट व नाट्य लेखक, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त शिवा करडे, चित्रपट अभिनेते व अनेक मालिकेतील कलाकार वैभव बेलसरे, सिनेअभिनेता व साहित्यिक राजेंद्र उगले (नाशिक), चंद्रकांत मिसाळ (पुणे), भानुदास धोत्रे (परभणी), कुचेकर पाटील (पुणे), आकाश महालपुरे (जळगाव), ओमप्रकाश कांबीलकर (औरंगाबाद), प्रशांत घोडके (सोलापूर), श्याम ठाणेदार (दौंड), श्रीमती अन्नपूर्णा भंडारे (गट शिक्षण अधिकारी तथा साहित्यिक,लातूर), श्रीमती सरिता कलढोणे (जुन्नर उत्तर पुणे), परशुराम नागरगोजे, दत्ता पवार (अहमदनगर), श्रीमती सुरेखा खोकले (नागपूर), सुरेश मंत्री (अंबाजोगाई), दिलीप कांबळे (उस्मानाबाद), चंद्रकांत झटाळे (अकोला), लोमेश तांदळे (बीड), सुरेश तळेकर, संतराम जोगदंड (गेवराई) या साहित्यिकांची उपस्थिती राहणार आहे. आम्ही हे सर्व साहित्यिक सतत एकमेकांच्या संपर्कात आहोत मात्र एकमेकांना प्रथमच प्रत्यक्ष भेटण्याची व विचारांचे आदान-प्रदान करण्याची संधी आयोजकांनी आम्हाला या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे असे मला वाटते. महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यातील आलेल्या या साहित्यिकांच्या मदतीने जिल्हावार साहित्य संघाची समिती गठीत केली जाणार आहे. हे साहित्यिक आपापल्या जिल्ह्यात जावून शाळा, महाविद्यालये यांना भेटी देवून नव साहित्यिकांना मार्गदर्शन करून साहित्य लिहिण्यासाठी प्रेरीत करतील. या संमेलनाच्या रुपानं या साहित्य चळवळीची मुळं या ११ जिल्ह्यात पोहचतील आणि नजीकच्या काळात साहित्य संघाचे राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित झालेले आपल्याला पहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही. याशिवाय प्रेम लागी जीवा, जिद्दारी, झोंबीवली या मराठी चित्रपटात प्रमुख भूमिका तसेच अगं बाई, सासु बाई, काय घडलं त्या रात्री, स्वराज्य जननी जिजामाता, सहकुटुंब सहपरिवार, बाळू मामाच्या नावान चांग भलं, नवनाथ यासारख्या मालिकांमध्ये भूमिका केलेले चित्रपट अभिनेते रवींद्र विक्रम ढगे हेही उपस्थित राहणार आहेत.
प्रचलीत साहित्य संमेलनांना हल्ली राजकिय स्वरूप प्राप्त झालेले आपल्याला दिसते. या संमेलनाच्या व्यासपीठावर मात्र आपल्याला कोणताही राजकिय पक्षाचा पदाधिकारी अथवा सामाजिक संघटनेचा सदस्य नसल्याचे वर उल्लेखीत केलेल्या मान्यवरांच्या नावावरून आपल्याला लक्षात आले असेलच. हेच या पहिल्या- वहिल्या साहित्य संमेलनाचे वैशिष्टय आहे. मात्र ईतर कोणत्याही साहित्य संमेलनांवर टिका करण्याचा किंवा उणेदुणे काढण्याचा आयोजकांचा हेतू नसून ग्रामीण नव साहित्यिकांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, साहित्याची एक नविन चळवळ ऊभा करणे हा या संमेलनाच्या आयोजनामागील शुद्ध हेतू आहे.
या साहित्य संमेलनात जवळपास चार पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. सोबत अनाथांची माय म्हणून ओळखल्या गेलेल्या सिंधूताई सपकाळ ज्यांचे शिक्षण केवळ चौथीपर्यंत झालेले होते. त्यांच्या साहित्याची दखल घेवून कर्नाटक सरकारने त्यांचे साहित्य बोर्ड परीक्षेच्या अभ्यासक्रमात ठेवले आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या साहित्याची दखल अद्याप म्हणावी तशी घेतेलेली नाही. त्यांचे साहित्य राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी सातत्याने होत आहे. या साहित्य संमेलनात त्यांचे साहित्य राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे तसेच अनाथ मुलांसाठी काम करणा-या व्यक्तीस मग ती पुरूष असो किंवा महिला दरवर्षी सिंधूताई सपकाळ यांच्या नावाने १ लाख रूपये व स्मृतीचिन्ह देवून राज्यपालांच्या हस्ते सन्मानीत करण्यात यावे हि मागणी शासनाकडे लावून धरली जाणार आहे.
उपस्थित साहित्यिकांचे नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन, नव साहित्यिकांना स्वरचित साहित्य सादर करण्याची संधी, सिंधूताई सपकाळ यांच्या साहित्याचा उचित सन्मान करण्याची मागणी असं हे छोटेखानी एकदिवसिय साहित्य संमेलन का असेना वैविध्यपूर्ण व संस्मरणिय ठरेल व या संमेलनास रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. आपण नवोदित साहित्यिकांनी या साहित्य संमेलनास उपस्थित राहून आपले साहित्य सादर करावे तसेच रसिक श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात या साहित्य संमलनास उपस्थित राहून साहित्य सादरीकरणाचा आस्वाद घेवून या नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहित करावे असे आव्हान मी आयोजकांच्या वतीने करीत आहे.
- सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा