भारताच्या चंद्रयान २ मोहिमेची जगात सगळीकडे चर्चा झाली. ऑर्बिटरच्या मदतीने विक्रम लॅन्डरचा ठावठिकाणा तर लागला पण त्याच्याशी अजून संपर्क जोडणे शक्य झाले नाही. जरी विक्रम लॅन्डरचे काम ठप्प असले तरीही ऑर्बिटरचे काम सुरळीत सुरु असल्यामुळे चंद्राचा अभ्यास करणे आपल्या अवकाश संशोधकांना शक्य होणार आहे. पण चंद्रयान २ नंतर पुढे काय असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला होता. प्रयोग करताना अपयश आले तरी शास्त्रज्ञ आणि संशोधक त्यांचे काम थांबवत नाहीत. ते लगेच मागच्या प्रयोगात काय चूक झाली हे शोधून काढतात आणि पुढच्या अभ्यासाला लागतात. चंद्र आणि मंगळ मोहीम यशस्वीपणे राबवल्यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो शुक्रावर यान पाठवण्याच्या तयारीत आहे. हे मिशन २०२३-२५ दरम्यान पार पाडले जाण्याची शक्यता आहे. या मोहिमेला शुक्रयान असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून
मानव पृथ्वीच्या बाहेर जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेंव्हा
असा विषय येतो तेव्हा शुक्र ग्रहाचे सर्वात आधी नाव घेतलं जातं. शुक्र हा
सूर्यमालेतील सर्वात रहस्यमय ग्रह आहे. शुक्र हा ग्रह आपल्यापेक्षा सूर्याच्या ३० टक्के जवळ
आहे. त्यामुळे शुक्रावर पृथ्वीपेक्षा अति जास्त प्रमाणात सोलर रेडिएशन आहे आणि
उष्णता देखील प्रचंड आहे. तो सल्फरच्या ढगांनी झाकलेला आहे, म्हणून
पृष्ठभागावर ज्वालामुखी आणि लावा आहे. एकेकाळी शुक्र हा
पृथ्वीसारखाच ग्रह होता. परंतु, कालांतराने पृथ्वीवर जीवसृष्टीची भरभराट झाली आणि
शुक्रावर त्याचा मागमुसही नाही. सप्टेंबर २०२० मध्ये शास्त्रज्ञांनी शुक्रावर फॉस्फिन
वायू सापडल्याचा दावा केला होता. फॉस्फरसच्या एका कणापासून
आणि तीन हायड्रोजन कणांपासून तयार झालेला हा अणू आहे. हा वायू सूक्ष्म जीव देखील
बनवतो. पृथ्वीवर फॉस्फीनचा संबंध सजीवांशी आहे. फॉस्फीन पेंग्विनसारख्या
प्राण्यांच्या पोटात किंवा दलदलीसारख्या कमी प्राणवायूच्या ठिकाणी आढळणाऱ्या
सूक्ष्म जीवांमध्ये आढळतो. सूक्ष्म जीवाणू ऑक्सिजन अभावी
हा वायू उत्सर्जित करतात. फॉस्फीनला कारखान्यांमध्येही तयार करता येऊ शकतं. पण शुक्र
ग्रहावर ना कारखाने आहेत ना पेंग्विन. मग शुक्र ग्रहावर हा वायू कुठून आला? तोही ग्रहाच्या
पृष्ठभागापासून ५० किलोमीटर उंचीवर का आहे? शास्त्रज्ञांनी शुक्र
ग्रहावर जीव असल्याचा दावा केलेला नाही. पण या शक्यतेबाबत अधिक संशोधन करणं गरजेचं
आहे. शुक्राच्या ढगांमध्ये हा वायू मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. शुक्र
ग्रहाबद्दल आणि तिथे आढळून आलेलं फॉस्फिनचं प्रमाण लक्षात घेता फॉस्फिनच्या अजैविक
माध्यमाचा शोध लागलेला नाही. म्हणूनच शुक्रावर सजीव असण्याच्या शक्यतेबाबत विचार
केला जाऊ शकतो. शुक्रावर वायुमंडळाचा जाड थर असून त्यात
कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक आहे. येथील वातावरणात ९६ टक्के कार्बन
डायऑक्साईड आहे. या ग्रहावर वायुमंडळाचा दबाव पृथ्वीच्या तुलनेत ९०
पटीने अधिक आहे. शुक्राच्या पृष्ठभागावरील तापमान एखाद्या पिझ्जा
ओव्हन प्रमाणे ४०० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त आहे. म्हणूनच जर तुम्ही
शुक्र ग्रहावर पाय जरी ठेवला तरी काही सेंकदात तुम्ही भाजून निघाल. त्यामुळेच
शुक्रावर जीव असतील तर ते पृष्ठभागापासून ५० किलोमीटरच्या
उंचीवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्र ग्रहावरील ढगांमध्ये जीव आढळत
असतील तर त्यामुळे अनेक गोष्टी समजण्यास आपल्याला मदत होईल. कारण याचा अर्थ
आकाशगंगेत इतरही ठिकाणी जीव असू शकतात या शक्यतेला वाव आहे. असं असेल तर मग
जगण्यासाठी पृथ्वीसारखाच ग्रह असण्याची आवश्यकता नाही. कारण आकाशगंगेत
शुक्रासारख्या प्रचंड उष्ण ग्रहावरही जीवन आढळू शकतं. भारताची ही मोहिम पृथ्वीबाहेरील जीवनाची
पुष्टी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे शुक्र ग्रहाचा
अभ्यास करणे हे इसरोचे ध्येय आहे.
शुक्राच्या वातावरणात इतके दाट ढग आहेत की त्याचा
पृष्ठभागापर्यन्त सूर्याचा उजेड पोहचणे अवघड जाते. ह्याचाच अभ्यास
करून शुक्र ग्रहाविषयी अधिक माहिती मिळवण्याचा इसरोचा उद्देश आहे. हे यान शुक्र
ग्रहाभोवती फिरताना तिथे जीवसृष्टीची काही शक्यता आहे की नाही? सर्वात उष्ण
ग्रहाच्या पृष्ठभागाखाली काय आहे? तसेच, शुक्राच्या रहस्यमय
सल्फ्यूरिक ऍसिड ढगांचे रहस्य काय आहे? हे शोधून काढेल. या मोहिमेत शुक्राच्या पृष्ठभागाचे परीक्षण करणे, खालच्या पृष्ठभागाच्या
थरांचे परीक्षण करणे, सक्रिय ज्वालामुखी शोधणे, लावा प्रवाह, शुक्र ग्रहाची रचना
आणि आकार याबद्दल माहिती गोळा करणे ही कामे केली जातील. शुक्र ग्रह, शुक्राच्या वातावरणाची तपासणी
करण्यासाठी आणि सौर वाऱ्यांशी शुक्राचा संबंध शोधण्याची माहिती मिळेल. शुक्रावरील
घनदाट ढग, शुक्राचा पृष्ठभाग, त्यावर सोलर रेडिएशनचा होणारा परिणाम, आणि सोलर विंड
ह्या सगळ्याचा प्रोब द्वारे अभ्यास करणे हे ह्या मिशनचे मुख्य उद्दिष्टय असेल.
शुक्र पृथ्वीपासून सरासरी
४१० दशलक्ष किमी दूर आहे. सूर्याभोवती फिरत असताना ह्या अंतरात वाढ कमी जास्त होत
राहते. डिसेंबर २०२४
मध्ये जेव्हा पृथ्वी आणि शुक्र जवळ येतील तेव्हा शुक्रावर यान सोडण्यात येणार आहे. या
वर्षांत पृथ्वी व शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे, की प्रणोदकाचा कमीत कमी वापर
करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे अंतराळयानाला सर्वात
लहान कक्षीय मार्ग निश्चित करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची स्थिती
त्यानंतर २०३१ साली उपलब्ध राहणार आहे. ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणे आणि
त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे असे लक्ष्य
ठेवण्याचा इस्रोने विचार केला आहे.
शुक्रयानमधील सर्वात प्रमुख
साधन म्हणजे पेलोड हे हाय रिझोल्युशन सिंथेटिक अपर्चर रडार असेल. ते शुक्र
ग्रहाच्या पृष्ठभागाचे परीक्षण करेल. कारण शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग सल्फ्यूरिक
अॅसिडच्या दाट ढगांनी वेढलेला आहे. त्यामुळे शुक्र ग्रहाचा पृष्ठभाग सहसा दिसत
नाही. आतापर्यंत कोणत्याही देशाने किंवा अवकाश संस्थेने भूपृष्ठाखालील अभ्यास
केलेला नाही. भारत जगात प्रथमच हे काम करणार आहे. आपण शुक्र ग्रहावर उप-पृष्ठभाग
रडार उडवणार आहोत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्र मोहिमेचा प्रकल्प
अहवाल तयार केला आहे. खर्चाची तयारी केली जात आहे. या प्रकल्पाबाबत सरकार आणि
शास्त्रज्ञांचे एकमत आहे. आत्ताच योग्य उपकरणांसह उपग्रह बनवून शुक्र ग्रहाच्या
दिशेने प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू आहे. शुक्रावर यान पाठवणे भारतासाठी सोपे
काम आहे.
शुक्र मोहिमेची आखणी करणे व ती प्रत्यक्षात आणणे यांची क्षमता
भारताकडे असल्यामुळे, अतिशय कमी वेळेत ही मोहीम पूर्ण करणे भारताला शक्य आहे. ही मोहीम
इस्रोच्या विश्वसनीय रॉकेट जीएसएलव्ही
एमके-2 वरून प्रक्षेपित केली जाईल. भारत इतर देश आणि
अवकाश संस्थांप्रमाणे शुक्रावर पाठवलेल्या मोहिमांची कॉपी करणार नाही. इस्रोचे शास्त्रज्ञ
शुक्र ग्रहासाठी उच्च दर्जाचे प्रयोग तयार करतील. जसे इसरो
ने
चांद्रयान-1 आणि मंगळयान (मार्स ऑर्बिटर मिशन) मध्ये केले होते. त्यामुळे पुन्हा
एकदा जागतिक स्तरावर भारताचा आणि वैज्ञानिकांचा झेंडा फडकवता येईल. शुक्रावरील यापूर्वीच्या
मोहिमांमधील प्रयोगांची पुनरुक्ती करू नये आणि चांद्रयान-१ व मार्स ऑर्बिटर मिशन
यांच्या वेळी जसे उच्च प्रभावी फलित साध्य झाले होते, तसेच पुन्हा करण्यावर लक्ष
केंद्रित करावे लागेल. इसरोसाठी चांद्रयान २ ही फक्त एक सुरुवात होती. अजून बरेच
काम आणि बऱ्याच मोहीमा इस्त्रोद्वारे आखल्या जातील आणि आपले संशोधक त्या नक्कीच
यशस्वी करून दाखवतील.
- सुरेश मंत्री.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा