भारतीय सेनेत पारदर्शकतेची आवश्यकता
भारतीय सेना जगातील सर्वाधिक शिस्तबध्द सेन्या मधिल एक समजली जाते, परंतू
दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की, गेल्या काहीं दिवसांपासून
सोशल मीडिया वर भारतीय जवानांद्वारा जे काही व्हीडिओ शेअर केले जात आहेत त्यामुळे
भारतीय सेनेच्या टिकाकारांना एक आयती संधी प्राप्त झाली आहे.जम्मू-काश्मिर
मध्ये तैनात सिमा सुरक्षा दलाचा जवान तेज बहादुर यादव याने जवानांना मिळ्णा-या
गुणवत्तेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उठवले तर लांस नायक यज्ञ प्रताप सिंह ने आरोप
लावला की,सेनेतील अधिकारी जवानांचे शोषण करतात.सीआरपीएफ मधील
जवान जीत सिंह याने सुविधांची कमतरता आणि सेना आणि निम लष्करी दलात भेदभाव होत असल्याचा
व्हिडिओ फेसबुक आणि युटयुब वर पोष्ट केला.अर्थात गृह मंत्रालयाने नुकत्याच
पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या रिपोर्ट मध्ये तेज बहादुर यादव च्या आरोपात तथ्य नसल्याचे
सांगून सिमा सुरक्षा दलाकडे पुरेसा राशन पुरवठा होत असल्याचे म्हटले आहे.
तरीही भारतीय सेना आणि सरकारला या
गोष्टीला सहजतेने घेण्याऐवजी अतिशय गंभीरतेने घेतले पाहिजे असे म्हटल्यास
अतिशयोक्ती होणार नाही.या व्हिडिओ मागील सत्यता तपासणे, तपासून
त्यातील त्रुटी दूर करणे हे भारतीय जवान आणि अधिकारी यात सामंजस्य निर्माण
करण्यासाठी गरजेचे आहे.भारतीय सेनेमध्ये जूनिअर कमीशंड ऑफीसर्स ची भूमीका अत्यंत
महत्वपूर्ण असते.एकतर हे अतिशय अनूभवी जवान असतात जे नायब सुभेदार,सुभेदार आणि मेजर च्या रुपात पुल म्हणून काम करतात.जर अशा पध्दतीने एका
नंतर एक आरोप भारतीय सेनेच्या बाबतीत होत असतील तर निश्चितच या पुलामध्ये कुठे तरी
तडा निर्माण झाला आहे.या आरोंपामागे सामाजिक बदलांची निश्चितच पार्श्वभूमी आहे.
आता आपण मुल आणि वडिलाच्या नात्या विषयी विचार केला तर पूर्वी मुलगा त्याच्या
वडिलांना काही सांगायचे तर टाळायचा आता मात्र लहान-लहान मुले सुध्दा आपल्या
वडिलांसोबत चर्चा करताना दिसतात,वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार
ठेवतात.स्पष्टपणे म्हणायचं झाल तर हा सगळा बदल घडवून आणण्यात तंत्रज्ञानाची भूमिका महत्वाची राहिली आहे. तंत्रज्ञानाने
ज्याला हवं त्याला ज्ञान ही उपलब्ध करून दिले आहे.पूर्वी मोठयांचा अनूभव जास्त असे
म्हणून लहानांना त्यांचे मत ऐकावे लागे.मात्र आता जग फक्त अनुभवाच्या आधारावर नाही
चालत तर त्या सोबत ज्ञानाची जोड हवी.हे ज्ञान आत्ताच्या नविन पिढीला गुगल,विकिपीडिया च्या माध्यमातून उपलब्द होत असताना आता तंत्रज्ञान आणि
आकडयांनाही महत्व आले आहे.
याच गोष्टीचा आधार घेवून आपण सेनेच्या बाबतीत विचार करु या. पूर्वी सेनेत दाखल
होणारे युवक अभावानेच उच्च शिक्षित असायचे,यापैकी बहुतांक्ष तरुण ८ वी किंवा १०
वी पर्यंत शिक्षण घेतलेले असायचे.आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. उच्च शिक्षित
तरुण मोठया प्रमाणावर सेनेत दाखल होत आहेत.हे गरजेचे आहे की,सेनेच्या
एखादया मेजरने किंवा उच्च अधिकारा-याने त्यांना दिलेला आदेश पाळायला हवा मात्र
त्यासोबत या जवानांना सरकारने कोणते अधिकार आणि कोण-कोणत्या सुविधा दिल्या आहेत हे
सुध्दा त्यांना आता माहित आहे,समजतेही.अशात सरकार त्यांना
जेवणात काय-काय देते याची आकडेवारी त्यांच्या जवळ आहे आणि यात जर काही गडबड झाली
तर वाद निर्माण होणारच.माझ्या सांगण्याचे तात्पर्य असे की,मग
आपले घर असो किंवा सेने सारखे संघटन ही बदलेली परिस्थिती प्रत्येकाला लक्षात
ठेवायला हवी.उच्च पदावरिल अधिका-यांना हे लक्षात ठेवायला हवे की, प्रत्येक संघटनेत लोकशाही आणि पारदर्शकता असणे वेळेनूसार गरजेचे झाले
आहे. ही गोष्ट ही खरी आहे की,सेना आपल्या जवानांना फार मोठया
प्रमाणावर सुविधा देवू शकत नाही,नाही मोठया प्रमाणात
स्वातंत्र्य.सोशल मीडियावर आपल्या समस्यांचे रडगाणे गाणा-या जवानांना हे लक्षात
ठेवायला हवे की,जर तो युध्द काळात बंदी बनवला गेला तर त्याला
डाळ-तडका तिथे भेटेल का? अतिशय दूर्गम बर्फाळ भागात सर्व
सूविधा पोहचवता येत नाहीत.ही गोष्ट खरी आहे की,सेनेतील काही
अधिकारी आणि त्यांची भ्रष्ट टोळी सामान्य जवानांचे अधिकार हिरावून घेत आहे,परंतू त्यांना सेनेत राहूनच या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला हवं.
अन्यथा जर सेनेतील शिस्त बिघडली तर सेनेचा अर्थच शून्य होवून जाईल.या गोष्टीत तथ्य
आहे की,सेनेतील जवानांकडून अनेक तक्रारी येत आहेत.ही गोष्ट
दुखद सुध्दा आहे.ज्या तरुणांनी सेनेत दाखल होवून देशसेवा करण्याचे आणि शत्रूशी दोन
हात करण्याचे स्वप्न बघितले त्यांनी अशा प्रकाराची कल्पना सुध्दा केली नसेल.सेनेच्या
जवानांकडून ज्या तक्रारी येत आहेत त्या खोटया नसून सत्य आहेत हे सर्वांना माहित
आहेत मात्र केवळ काही भ्रष्ट अधिका-यांमुळे संपूर्ण सेनेवर प्रश्नचिन्ह उभा करणेही
चूकीचे आहे.
सेनेत जवानांची भरती करतानाही अधिका-यांकडून भ्रष्टाचार केला जातो असा आरोप
नेहमी केला जातो.प्रत्यक्ष मैदानावर शारीरीक चाचणी झाल्यानंतर लिखीत चाचणी घेताना
आणि मेडीकल करताना वेगवेगळे दर लावले जातात असा आरोप होत आला आहे. भ्रष्टाचार ही
देशाला लागलेली एक किड आहे जी आज नाही तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खिळखिळी
करत चालली आहे.यासाठी सरकारला वेग-वेग़ळ्या बाबींवर कार्य करावे लागेल.सेनेतील
भ्रष्टाचारावर अंकुश ठेवणे,सेनेच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणावी लागेल,खासकरून जवानांना दिल्या जाणा-या सुविधांच्या बाबतीत.गरज आहे ती नव्या जमान्यासोबत
सेनेतील अधिकारी आणि जवानांना प्रशिक्षित करण्याची.सोशल मीडिया काय आहे? यावर व्हिडिओ पोष्ट करण्याचे काय परिणाम होतात,हा
विषय देशाच्या सुरक्षीततेशी कसा जोडला गेला आहे याचे प्रशिक्षिण त्यांना दयायला
हवे. सोशल मिडियाचे उपयोग आणि त्याच्या धोक्यांच्या प्रति सदैव जागरुक राहणे
गरजेचे आहे.
ज्या तीन जवानांनी तक्रारी केल्या आहेत त्यांच्या कडून काहीतरी धडा घेतला
पाहिजे.या तिघांनी सेनेबद्दल असंतोष व्यक्त केला नाही तर सेनेतील भ्रष्टाचार आणि
वागवणुकीवर आपले व्यक्तीगत मत ठेवले आहे.सेनेला कार्यक्रम आयोजीत करून जवानांना
मनमोकळ्यापणाने बोलण्याची संधी दिली पाहिजे,जेणेकरून त्यांच्या समस्यादूर
करण्यासाठी प्रयत्न करता येतील.जर त्यांचे म्हणणे ऐकूण घेतले नाही तर साहजीकच सोशल
मीडियावर ते यापुढे ही तक्रारी करतील.आत्ता गृह मंत्रालयाने निम लष्करी दलातील
जवानांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणली आहे.जर कुणा जवानाला फेसबुक,ट्विटर,व्हाट्सअॅप,इंस्ट्राग्राम
यावर चित्र किंवा व्हिडिओ पोस्ट करायचा असेल तर त्यासाठी डायरेक्टर जनरल ची
परवानगी घ्यावी लागेल.सेनेच्या सुरक्षीततेसाठी आणि शिस्तीसाठी हे पाऊल तात्काळ उचलणे
गरजेचे होते. मात्र ही बंदी जास्त काळ लागू राहू शकत नाही व त्यामुळे जवानांचे
प्रश्नही सुटणार नाहीत.त्यामुळे जवानांच्या समस्यांचे दूरगामी परिणाम लक्षात घेवून
त्याचे निराकरण करण्याची योजना बनवनणे गरजेचे आहे.
-सुरेश मंत्री

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा