मुख्य सामग्रीवर वगळा

बाबुजी धिरे चलना.....


बाबुजी धिरे चलना.....
बाबुजी धिरे चलना,जरा सँभलना,बडे धोके है इस राह में’ हे गीत जरी प्रेमाच्या वाटेतील धोक्यांबद्दल असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांच्या बाबतीत ही सत्य ठरते.रस्ते अपघातांबद्दल आज कुणाला माहित नाही.प्रत्येक महिन्यात आपण आपल्या नातेवाईक, मित्र वा ओळखीच्या व्यक्तीच्या अपघाताबद्दल ऐकतो किंवा एखादया अपघाताचा प्रत्यक्ष साक्षिदार होतो.आज आपण एखादया महत्वाच्या कामासाठी जर बाहेर पडलो तर ते काम करून आपण परत घरी येवू का नाही हे सांगता येत नाही.कारण आज रस्त्यांवर चालणे अवघड झाले आहे.आज प्रत्येकाला रस्त्यावर पायी चालताना किंवा वाहन चालवताना भिती वाटत आहे.नेमक या मागील कारण काय आहे?
काही दिवसांपूर्वीची माझ्यासमोरच घडलेली घटना आहे.दोन अल्पवयीन मुलांनी मोटारसायकलची शर्यत लावली आणि रहदारीची वर्दळ असलेल्या रस्त्यावर तुफान वेगाने गाडया पळवण्यास सुरुवात केली.काही क्षणातच धडाम असा आवाज आला व लोकं आवाजाच्या दिशेने धावू लागली.या पैकी एकाच्या मोटारसायकलीने समोरून येणा-या शिक्षकाला धडक दिली होती.त्या बिचा-या शिक्षकाचा एक पाय या अपघातात जायबंदी होवून कायमचे अपंगत्व आले. शहर असो वा खेडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी अल्पवयीन मुले वेगाने वाहने चालवताना दिसतील.या अल्पवयीन मुलांना ना वाहतुकीचे नियम माहित असतात ना अपघाताच्या  परिणामांची जाणिव असते.यासाठी फक्त शासनाला किंवा त्यांच्या पालकांना जबाबदार धरून चालणार नाही तर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रुपाने संपूर्ण समाजच याला जबाबदार आहे.आकडेवारी असे सांगते की, भारतात प्रत्येक मिनिटाला एक अपघात होतो.प्रत्येक वर्षी भारतात जवळपास ५ लाख लोकांचे अपघात होतात.या पैकी जवळपास दिढ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागतो.आपल्याला विश्वास बसणार नाही परंतू रस्ते अपघाताच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो.
आपण जर रस्ते अपघातांच्या कारणांवर नजर टाकली तर परिस्थिती खूप वाईट असल्याचे दिसून येते.आकडेवारी वरून असे दिसून येते की, भारतातील ७७ टक्के अपघात हे चालकाच्या निष्काळजीपणा मुळे होतात.याचा अर्थ असा होतो की, आपल्याकडे लोकांना वाहने चालवता येत नाहीत आणि जर येत असतील तर त्यांना वाहतुकीचे नियमच माहित नाहित.वाहतुकीचे नियम तोडने हा जणू आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.रस्त्यावर सिग्नलचा लाल दिवा लागलेला असतो आणि हा सिग्नल तोडून पूढे सुसाट वेगाने जाण्यात जो आनंद मिळतो बहुदा असा आनंद क्वचितच इतर गोष्टीत मिळत असेल.
मध्यंतरी महाराष्ट्र शासनाने हेल्मेटची सक्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र या निर्णयाला लोकांचा विरोध व्हायला सुरूवात झाली.पुणेकरांच्या बाबतीत तर जणू हेल्मेट वापरणे हे जणू आपल्या शानच्या विरोधातच.ही हेल्मेट सक्ती नंतर कुठे हवेत विरली देव जाणे.जेंव्हा अपघात होतो तेंव्हा कायमचे अपंगत्व येवून आयुष्यभर कष्ट झेलावे लागले की असे लोक मात्र हेल्मेट न वापरल्याचा पश्चताप करतात.अशीच अवस्था आपल्याकडील रस्त्यांची आहे.एकदा रस्त्याचे काम झाले की,त्या रस्त्यावर कितीही खड्डे पडले तरी त्याची दुरूस्ती मात्र केली जात नाही.दिड ते दोन फुट खोलीचे खड्डे रस्त्यांवर असतात.रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते हेच समजत नाहीत.पावसाळ्यात तर जणू या रस्त्यांवर पूरच येतो.नेमका कुठे खड्डा आहे हेच कळत नाही अशात या रस्यांवरून जेंव्हा ओव्हरलोड वाहने वेगाने जातात तेंव्हा अपघात होतात.१.५ टक्के अपघात हे रस्त्यावरील खड्डयांमुळे होतात.भारतात २०१५ मध्ये जवळपास १,४६,१३३ लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला.२०१४ मध्ये याचे प्रमाण ४.५ टक्क्यांनी  कमी होते.म्हणजे रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.ही शरमेची गोष्ट आहे की,गेल्या १० वर्षात भारतात १३ लाख लोकांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला.गेल्या १० वर्षात रस्ते अपघातात ४५ टक्के वाढ झाली आहे जी ईतर नैसर्गिक आपत्तीत होणा-या मृत्यूंपेक्षा जास्त आहे.
वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन आणि शिक्षेच्या बाबतीत बोलायच म्हटलं तर मोटार वाहन संशोधन अधिनियम विधेयक २०१६ अनुसार या बाबतीत कडक तरतुदी केल्या आहेत.जर आपण विना परवाना वाहन चालवित असताल किंवा अल्पवयिन असताना वाहन चालवित असताल तर दोन्ही परिस्थितीत ३ महिन्यांचा कारावास किंवा रु.५००/‌ दंडाची तरतूद किंवा दोन्ही शिक्षांची करण्यात आली आहे.पण हा कायदाच मानतो कोण?लोकांना ५००/- रुपये दंडाचा पर्याय सोपा असल्याने ते दंड भरून मोकळे होतात.तसेच मदय प्राशन करून वाहन चालविल्यास १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे मात्र अशा वेळी पकडले गेल्यास हे लोक थोडी फार लाच घेवून सुटका करून घेतात.याचाच अर्थ रस्ते अपघातात आपल्याकडील भ्रष्ट व्यवस्था ही कारणीभूत आहे.
विना हेल्मेट वाहन चालविल्यास ही पाचशे रुपये दंड तसेच ३ महिन्यांसाठी वाहन चालविन्याचा परवाना रद्द करण्याची तरतूद आहे.मात्र मोठया महानगरांतही लोक विना हेल्मेट किंवा विना सिट बेल्टचा वापर केल्याशिवाय वाहने चालवताना सहज दिसतात.वाहतुकी संदर्भात अनेक कायदे आहेत मात्र यांची अंमलबजावनी प्रत्यक्षात कडकरित्या होत नाही.वाहन चालविण्याचा परवाना देत असतानाही अत्यंत निष्काळजीपणा बाळगला जातो.जर असा परवाना हवा असेल तर वाहतुक नियमांची चाचणी परीक्षा व वाहण चालवण्याची चाचणी दयावी असा नियम आहे मात्र ही गोष्ट मात्र प्रत्यक्षात अंमलात आणली जात नाही.देशातील ९९ टक्के वाहन चालविन्याचे परवाने विना चाचणी दिले जातात.परिवहन कार्यालयाच्या बाहेरील दलाला गाठले की विना चाचणी हा परवाना सहज मिळतो.मग भलेही आपल्याला गाडीचा क्लच आणि गिअरही माहित नसेल.सहसा ज्या लोकांकडे वाहन आहे असेच लोक वाहन चालविन्याचा परवाना काढतात.जवळपास दरवर्षी दिढ करोद परवाने परिवहन विभागाच्या एक हजार कार्यालयांमधून दिले जातात.जर परवाना देताना वाहतुकीचे नियम माहित आहेत की नाहीत तसेच वाहन चालविता येते की नाही हे जर बघितले जात नसेल तर अपघात होणारच.एकंदरीत रस्त्यावरील वाहतुकीची सुरक्षा राम भरोसे आहे.म्हणूनच म्हणतो,बाबुजी धिरे चलना.....
                                 -सुरेश मंत्री,धारूर    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...