आपलं संपूर्ण आयुष्य दूस-यांची उणी-दूणी काढण्यात, त्यांच्यातील कमतरता शोधण्यात जात. स्वत:ला मात्र आपण फार कमी ओळखतो, त्यामुळे आपल्यात असलेली सुप्त कौशल्ये स्वत: आपल्याला माहित नसतात. काहीसं असच माझ्या बाबतीत झाल. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अगदी ११ वी पासून मी पत्रकारीतेला सुरूवात केली. दै. लोकप्रश्नला धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून सहा वर्षे काम केल. पूढे मात्र शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी गाव सोडाव लागल आणि पत्रकारीता मागे सुटली. शिक्षक म्हणून काम करित असताना शाळेत नव्याने आलेल्या नकुशाच नाव बदलण्याचा प्रस्ताव मी कार्यालयामार्फत शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र अनेक महिने लोटुनही शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद भेटत नव्हता. तेंव्हा परत एकदा माझ्यातील पत्रकार जागा झाला आणि स्वानुभवातून लिहिलेला ‘नकुशा’ हा लेख साकार झाला. हा माझा पहिला लेख दै. झुंजार नेता मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या दैनिकाचे तत्कालिन कार्यकारी संपादक अशोक देशमुख यांनी मला फोन करून लेखाची प्रशंसा केली सोबत पूढे लेखन सुरू ठेवा अशी सूचना केली. मी हो-नाही म्हणत जरा कचरतच होकार दिला खरा पण पूढे जमेल का नाही अशी शंका वाटत होती. मात्र अशोक देशमुख साहेबांनी प्रोत्साहित केल्याने पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न केला आणि आज सातत्याने लेखन केल्याने तो प्रवास जवळजवळ दोनशे लेखांपर्यंत पोहचला आहे, जी महाराष्ट्रातील विविध नामांकीत दैनिकात आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. ख-या अर्थाने माझ्यातील लेखक अशोक देशमुख साहेबांनी जागा केला असं म्हणायला हरकत नाही.
स्तंभ लेखन करण हे खरंतर खूप
जबाबदारीच काम. मांडण्यासाठी घेतलेल्या विषयाच तुम्हाला ब-यापैकी ज्ञान असायला हवं
सोबत स्तंभ लेखनासाठी मोठा मजकुर लागत असल्याने विषयास अनुसरून तुम्हाला संदर्भ
साहित्य भेटणं महत्वाच असतं. लिहित असताना मूळ विषय शेवटपर्यंत धरून ठेवता आला
पाहिजे. विषय मांडण्यात थोडीशीही चूक झाली तर वाचकांच्या टिकेला सामोर जाव लागत पण
जर विषय योग्यरितीने मांडला तर त्यांची प्रशंसा मिळते हेही खरं. तुमच्या लिहाणातील
प्रविणता बघून अनेकजण मग स्वत:हून विषय सुचवतात आणि जरा या विषयावर लिहाच असा
आग्रह करतात. माझा ‘लोक काय म्हणतील ?’ हा लेख प्रकाशित झाल्यानंतर
माझा फोन दिवसभर खणखणत होता. प्रत्येकाला त्यात जे लिहलयं ते
आपल्याबाबतीतच घडलयं असं वाटत होत. ‘स्वप्न विकणा-या शाळा’ हा माझा लेख प्रकाशित
झाल्यानंतर दिवसभर विनाअनुदानित शाळांमधील वेठबिगारीवर काम करणा-या शिक्षकांचे
फोन येत राहिले. एकेदिवशी रणजित जोगदंड नावाचा
एक चळवळीतला तरूण कार्यकर्ता माझ घर शोधत आला. माझी भेट घेवून जरा आमच्या शेत
मजुरांवर लिहाकी असा आग्रह करू लागला. मी म्हटलं,
प्रयत्न करून पाहिन. तो गेल्यानंतर त्याच्या डोळ्यातील माझ्याबद्दलचा तो
आत्मविश्वास मला स्वस्थ बसू देईना. यातून ‘व्यथा शेतमजुरांची’ हा लेख तयार झाला
आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिकांमध्ये प्रकाशित झाला. यावेळी त्या तरूणाच्या
चेह-यावरील आनंदच मला प्रोत्साहित करून गेला. मुस्लीम महिलांच्या तीन तलाक समस्येवर मी
लिहिण्याचा निर्णय घेतला तेंव्हा अनेक अनुभवी मित्रांनी मला मौलिक सल्ला दिला, असल्या संवेदनशिल विषयाला हात नको घालुस. पण हा लेख प्रकाशित झालानंतर
केवळ मुस्लीम महिलांचेच नाही तर तरूणांचे आभार मानणारे फोन आल्यानंतर मला हायसं
वाटल. पूढेही हा विषय मी सातत्याने लावून धरला. कोरोना महामारीचा माझ्या जीवनातील
सर्वात वाईट काळ. माझ्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले त्यावेळी
मलाही कोरोनाची लागण झाल्याने मी संस्थात्मक विलगीकरणात होतो. अगदी जन्मदात्याच
शेवटच दर्शनही माझ्या नशिबात नव्हतं. त्यावेळी हॉस्पीटल मधूनच मी लिहिलेल्या ‘कोरोनाला
हलके घेवू नका’ या लेखाने वाचकांच्या डोळ्यात पाणी आणलं. कोरोना काळात
जनजगृती करणारी अनेक लेख मी लिहिले. मी सुरूवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही
मांडलेला विषय वाचकांना प्रत्येकवेळी आवडेलच असं नाही. माझा ‘केवळ रोहिंग्याच्या
बाबतीत दूजाभाव का?’ हा लेख प्रकाशित
झाल्यानंतर अनेक तथाकथीत सनातनी लोकांनी मला फोन करून रोहिंग्याची बाजू
घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
तुमच्या लेखनात तुम्ही सातत्य
ठेवायला हवं सोबत लेख प्रकाशित झाला नाही तर पदरी निराशा येते. पण निराश न होता
लिखाण सुरू ठेवायला हवं. माझी स्वत:ची लेखं सुरूवातीला अगदी एक्का-दुक्का दैनिकातच
प्रकाशित व्हायची. कधी तर खूप मेहनतीने लिहिलेला लेखच प्रकाशित होत नसे. मात्र
निराश न होता सातत्याने लेखन केल्याने त्याची दखल हळूहळू इतर दैनिकांनी घ्यायला
सूरूवात केली आणि आज ती महाराष्ट्रातील अनेक अग्रगण्य दैनिकांमध्ये आणि
मासिकांमध्ये प्रकाशित होत आहेत. कधीकधी खूप पठारावस्था येते, काही लिहावस वाटत नाही, मात्र कोणीतरी भेटतो आणि
म्हणतो, ‘‘बरेच दिवस झाल तुमचा लेख नाही वाचला, अगदी छान लिहिता, नवनविन विषय मांडता ’’ तेंव्हा
त्यांनी दिलेली दादच पुन्हा कागद आणि पेन घ्यायला लावते. लिहित असताना स्थानिक
राजकारणावर आणि स्थानिक गोष्टींवर लिहायच नाही हा कटाक्ष मी आत्तापर्यंत
जाणिवपूर्वक पाळला आहे. केवळ ‘जायभायवाडीकरांना
सलाम’ आणि एका नवोदित स्थानिक चित्रपट अभिनेत्याची घेतलेली मुलाखत हे दोन अपवाद.
मध्यंतरी शंकर चव्हाण या तरूण संपादकाने मला माझ सगळ साहित्य ब्लॉगरूपात संग्रही
ठेवण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच ‘विचार मंथन’ या ब्लॉगचा जन्म झाला. आजमितीला
या ब्लॉगची हजारो वाचकं आहेत. लवकरच माझ्या काही निवडक लेखांचा संग्रह पुस्तक
रुपात प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. अनेकांना अजूनही स्तंभ लेखन करणं म्हणजे
आपला वेळ वाया घालवणे असेल. मात्र एक शिक्षक म्हणून मला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक समस्यांवर आधारीत लेख लिहून त्या
प्रश्नांना वाचा फोडता आली हे मी माझे भाग्य समजतो. मी केवळ शिक्षक
असतो तर तो शिकवण्यापुरता मर्यादित असतो, आज मात्र
महाराष्ट्रातील तमाम वर्तमानपत्रांच आणि वाचकांच भरभरून प्रेम मला मिळतय, लोक आता दखल घेतायत यातच सर्व काही आलं.
- - सुरेश मंत्री.
.jpg)
सर!
उत्तर द्याहटवातुमचे काम कौतुकास्पद आहे
वेळ मिळेल तसा मी आपल्या लेख वाचत असतो. आपला लेख वाचत असताना, नजरेसमोर दृश्य उभे राहणे हे मला सतत अनुभवात येत असते.
जिवंत लेख काय असतो कदाचित मला माझ्या शब्दातून सांगता येईल असे नाही. पण मी प्रयत्न करतो कि माझ्या शब्दातून आपल्या लेखाचा जिवंतपणा मांडण्याचा
होय!