१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा अतिरेकी आदिल अहमद दार याने स्फोटकांनी भरलेल्या गाडीची धडक सीआरपीएफच्या ताफ्यातील बसला दिली होती. या भीषण स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. ऐन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही घटना घडल्यानंतर विरोधकांनी त्यावर बोट ठेवत काही प्रश्न उपस्थित केले होते. पुलवामाचा हल्ला झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळणे अपेक्षितच होते. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊन सरकारने शहीद जवानांना श्रद्धांजली द्यावी, अशी मागणी पुढे येऊ लागली होती. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलवामाच्या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात जवळपास ३०० दहशतवादी मारले गेले, असे सांगितले जात होते. तत्कालीन परराष्ट्र संबंध मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन बालाकोट हवाई हल्ल्यात दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले असून दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर पाकिस्तानकडून दुसऱ्याच दिवशी हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाकिस्तानच्या या आगळिकीला भारताने तात्काळ चोख उत्तर दिले. भारताच्या मिग २१ या लढाऊ विमानाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे शक्तिशाली फोर्स एफ-१६ हे लढाऊ विमान पाडून पराक्रम गाजवला. पण दुर्दैवाने विंग कमांडर वर्धमान यांच्याही जेटचे नुकसान झाल्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या हद्दीत उतरावे लागले. तिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना ताब्यात घेतले. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुखरूप सुटका व्हावी, यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत होता. भारतानेही आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तब्बल साठ तास पाकिस्तानच्या सैन्याचा छळ सहन केल्यानंतर अभिनंदन वर्धमान यांची १ मार्च २०१९ रोजी सुटका करण्यात आली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांती अबाधित राहावी, यासाठी अभिनंदन यांच्या सुटकेला मान्यता दिली. अभिनंदन वर्धमान यांना त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनी वीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.
पुलवामा हल्ल्याला चार वर्षे झाली असली तरी त्यावरून होणारे राजकारण थांबलेले नाही. सत्यपाल मलिक हे पहिले व्यक्ती नाहीत ज्यांनी पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. याआधी काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनीही असेच प्रश्न उपस्थित केले होते. मात्र भाजपाकडून जोरदार टीका झाल्यानंतर काँग्रेस पक्षातूनच दिग्विजय सिंह यांना शांत राहण्याचा इशारा देण्यात आला. २३ जानेवारी २०२३ रोजी दिग्विजय सिंह यांनी एक ट्वीट करत पुलवामा हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले ? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच सीआरपीएफच्या जवानांना एअर लिफ्ट करण्याची मागणी होत असताना त्यांना विमानाने का आणण्यात आले नाही ? असाही प्रश्न त्यांनी त्या वेळी उपस्थित केला होता. अर्थातच भाजपाकडून झालेल्या टीकेनंतर काँग्रेसने दिग्विजय यांचे वक्तव्य वैयक्तिक पातळीवरचे असून पक्षाशी त्याचा काही संबंध नसल्याचे सांगितले. सत्यपाल मलिक यांच्या या गौप्यस्फोटानंतर देशात मोदी सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात असून राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. पुलवामा हल्ला पूर्वनियोजित होता. सत्यपाल मलिक यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं नसून, हे सत्य आहे, त्या ४० जवानांची राजकीय स्वार्थापोटी हत्या झाल्याचा, गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. २०१९ ला लोकसभा निवडणुकीसाठी सामोरे जाणारे आताचे सत्ताधारी हे निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी गडबड करतील, असे माहित होते. विरोधकांनी अनेकदा त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रश्न विचारणाऱ्या विरोधी पक्षांना भाजपने देशद्रोही ठरवले. ३०० किलो आरडीएक्स पुलवामामध्ये पोहोचले कसे ? पुलवामाच्या रस्त्यावरुन कधीही सुरक्षाकर्मी प्रवास करत नाहीत. त्यांना सरकारने किंवा एअरफोर्सने विमान का दिले नाही ? की त्या ४० जवानांची हत्या करुन त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा डाव होता, असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
- सुरेश मंत्री.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा