ब्लूमबर्गच्या २०२२ च्या अहवालानुसार आशियातील देशांना यावर्षी विक्रमी उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागणार आहे. जागतिक पातळीवरील गव्हाच्या पुरवठ्यावर उष्णतेच्या लाटांचा परिणाम झाला आहे. थायलंड आणि बांगला देशातील तापमानातही सातत्याने वाढ होत आहे. चीनच्या युनान प्रांतात तर उष्णतेमुळे दुष्काळ पडला आहे. देशातील विविध भागांत सध्या अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट नोंदवली जात आहे. दरम्यान, मे महिन्यात देशातील अनेक भागात तीव्र उष्णतेची शक्यता आहे.
राज्यात
मे महिन्यात कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य
महाराष्ट्रात काही प्रमाणात उन्हाची झळ कमी बसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले
आहे. हवामान विभागाने
दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमाल
तापमान अधिक राहणार आहे. विदर्भातील काही ठिकाणी देखील कमाल तापमान सरासरीपेक्षा
अधिक राहण्याचा अंदाज आहे. विदर्भात एक-दोन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा
अंदाज असून महिन्यातील दोन दिवस सर्वाधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे.
उष्णतेच्या लहरींमुळे वातानुकूलित यंत्रे आणि पंखे यांचा वापर वाढतो.
यासारख्या उपकरणांमुळे विजेचा वापर वाढतो. विजेचा अतिवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पॉवर ग्रीडवर जास्त दाब येतो
आणि ब्लॅक आऊटचा धोका वाढतो. त्यामुळे विद्युत सेवा प्रभावित होऊन
उद्योगधंद्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. असे झाल्यास परिणामी
अर्थव्यवस्थेला हानी पोहोचू शकते. विजेचा मुबलक पुरवठा न झाल्यास अनेकांनी ब्लॅक
आऊटसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जास्त उष्णता लोकांसाठी घातकही ठरू शकते. हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व भारतातील काही भागात उष्ण हवामान दिसून येणार
आहे. देशाच्या पूर्व आणि मध्य भागात कमाल तापमान सामान्यापेक्षा जास्त राहण्याची
शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
काय काळजी घ्याल?
तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. या परिस्थितीत उष्णतेच्या लहरीबद्दल समाजामध्ये जनजागृतीची गरज आहे. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्था, रेडक्रॉससारखी संस्था, सरकार, स्थानिक प्रशासन या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.
· उष्णतेची लाट आल्यानंतर
आपण थेट ऊन्हाच्या संपर्कात येणं टाळलं पाहिजे. शरीराचं तापमान शक्य तितकं थंड
ठेवण्याचा प्रयत्न करावा.
· शरीरातील पाण्याचं प्रमाण
संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
· ORS, लिंबू सरबत, तांदळाची
पेज, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.
· चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील
पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
· हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
· किमान दोनवेळा थंड
पाण्याने आंघोळ करावी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा