भारतीय चित्रपट
आणि समाज-जागृती
चित्रपट आधुनिक युगातील महत्वपूर्ण देण
आहे.ई.सन.१९७०नंतर भारतीय समाजात चित्रपटांचा अधिक प्रसार झाला. हिंदी
चित्रपटांबरोबर अनेक प्रादेशिक चित्रपट निर्माण होत आहेत.चित्रपट हे नाटक व
तमाशाचे आधुनिक रूप आहे ज्याने आपल्या नविन रुपाने मानवाचे जीवन व समाजाला
सर्वांगाने प्रभावित केले आहे.यात साहित्य व कला यांचा सुंदर मिलाप करून मानवाचे
जीवन जीवंत रुपाने चित्रीत केले जाते.देशात चित्रपट उदयोगात मोठी वाढ झाली असून हा
जीवनाचा आवश्यक घटक बनला आहे. चित्रपटांचा समाजावर व्यापक प्रभाव पडतो.
चित्रपट हे न केवळ मनोरंजनाचे एक सोपे
व स्वस्त साधन आहे तर यात सामाजाचे वास्तविक चित्र उभे केले जाते.देशस्थिती व
समाजिक वातावरण यांचे हुबेहुब चित्र डोळ्यांसमोर उभे करून एका यशस्वी आलोचकाची
भुमिका चित्रपट निभावतात.जीवनाचा असा एकही अंग नाही ज्याची वास्तव वाटेल अशी
उभारणी पडदयावर केली जात नाही.समाजातील अनेक वाईट गोष्टींवर याद्वारे प्रकाश टाकला
जातो व सामाजिक संदेश देवून समाजागृती करण्याचे काम केले जाते.जसे स्त्रीअत्याचार,व्यसनाधिनता,अंधश्रद्धा,शोषण,बेरोजगारी,भ्रष्टाचार,दहशतवाद,जातीयवाद,निरक्षरता,शिक्षणाचा ढासळत चाललेला स्तर असे बरेच विषय हाताळले जातात. श्याम बेनेगल,केतन मेहता,गोविंद निहलानी,सईद मिर्झा,व्हि.शांताराम या सारख्या
दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांतुन अनेक सामाजिक विषय हाताळलेले दिसून येते.१९३६
मध्ये दिग्दर्शक हिमांशू राय यांच्या ‘अछूत कन्या’ या चित्रपटात जाती व्यवस्थेमुळे समाजात निर्माण झालेली
असमानता दाखवण्यात आली होती व समानतेचा संदेश ही देण्यात आला होता.राजकपूर
दिग्दर्शीत ‘जागते रहो’ (१९५७) हा ही सामाजिक विषयावर आधारलेला होता.‘शिक्षणाच्या
आईचा घो’,‘निशानी
डावा अंगठा’,‘थ्री-ईडीयट’ या सारख्या चित्रपटांतून शिक्षण
विषयक प्रश्नांवर प्रकाश टाकण्यात आला.‘उडता पंजाब’ या चित्रपटातून तरुणांची
व्यसनाधिनता व अंमली पदार्थांचा वाढत चाललेला व्यापार दर्शविण्यात आला.‘गोष्ट छोटी
डोंगरा एवढी’ मधून शेतक-यांची व्यथा मांडण्यात आली.‘तारें जमिन पर’ मधून प्रत्येक
बालक वेगळे असते व त्याच्या गरजाही वेगळ्या असतात हे दाखवण्यात आले.‘स्वदेस’ हा
अनिवासी भारतीयांना भारतात परत येवून देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो.‘प्रेमरोग’(१९८२)
हा विधवा विवाहाशी संबंधीत होता.‘रंग दे बसंती’ मध्ये शासनाच्या चूकीच्या धोरणाविरुद्ध
लढणारा तरुणांचा गट,‘दामिनी’ मध्ये न्यायासाठी लढणारी स्त्री,‘क्या कहना’ मधून कुमारी मातेचा प्रश्न,‘मातृभुमी’
मधून स्त्री-भृण हत्या , ‘ओह माय गॉड’ (२०१२) – देव आणि
अंधश्रद्धा,‘ब्लॅक फ्रायडे’-१९९३ मध्ये झालेले मुंबईतील साखळी
बाँम्बस्फोट,काय-दया-च बोला या मराठी चित्रपटातून
प्रशासनातील भ्रष्टाचार व कायदा व्यवस्थेतील त्रुटी मांडण्यात आल्या. या सारखे अनेक
सामाजिक विषय भारतीय चित्रपटांतून हाताळले गेले.अशा असंख्य चित्रपटांची नावे येथे
देता येतील.एवढेच नाही तर या असामाजिक
बाबींविरूद्ध लढण्याची प्रेरणाही दिली जाते.कौटुंबीक,सामाजिक,राजकीय क्षेत्राशी संबंधीत
समस्यांवरिल विषय यशस्वीपणे हाताळले जातात.ऐतिहासीक महापुरुषांच्या शोर्य कथांवर
चित्रपट तयार करून तो इतिहास डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत केला जातो.चित्रपट हे
दृक-श्राव्य माध्यम असल्याने याचा सहजरित्या परिणाम दर्शकांवर होतो.पुर्वी
समाज-जागृती तमाशा,नाटक,पथनाटय यांच्या माध्यमातून केली जायची.मात्र तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती
झाल्याने लोकांचा ओढा आता चित्रपटांकडे वाढला आहे. याला म्हणतात मनोरंजनातून
समाज-जागृती.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात
चित्रपट निर्मिती होत आहे.आत्तापर्यंत अनेक राष्ट्रभक्तीपर चित्रपटांची निर्मिती
करण्यात आली.अशा चित्रपटांत अधिक भूमिका करणारे अभिनेते मनोजकुमार यांना लोक ‘भरत कुमार’ म्हणून ओळखू लागले.अशा चित्रपटांतील देशभक्तीपर गीतांवर आत्ताची तरुणाई फक्त
थिरकतच नाही किंवा ते फक्त ही गीतं गुणगुणतच नाहीत तर या चित्रपटांनी भारतीय
युवकांत राष्ट्रप्रेम जागवण्याचे काम केले आहे.लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीत आजही डोळ्यात अश्रू आणते आणि देशासाठी शहिद झालेल्या जवानांची आठवण
करून देते.
वास्तविकदृष्टया चित्रपट हे कोणत्याही
देशाच्या व समाजाच्या विविध काळातील संस्कृतीचे वाहक आहेत. कधी-कधी याचे
दुष्परिणाम ही समाजावर होतात.पण कोणतीही गोष्ट स्वत: चांगली वा वाईट राहत नाही तर
तिचा प्रयोग कसा केला जातो यावर तिचे चांगले किंवा वाईटपण अवलंबून असते.आत्ता
ब-याच चित्रपटात अश्लिल दृष्यांचे प्रमाण वाढले आहे.द्विअर्थी,अभद्र शब्दांचा वापर,धुम्रपान करतानाची दृश्ये यांचे
प्रमाण वाढत आहे. त्याच प्रमाणे चित्रपट मनोरंजनासोबत व्यसनाचे साधन बनले
आहे.ज्याचा समाजावर प्रतिकूल परिणाम होत आहे.समाजाच्या समोर काही चित्रपटांतून
चूकीचा आदर्श निर्माण केला जात आहे.चित्रपटांचा योग्य सामाजिक उपयोग व्हावा म्हणून
सेंसॉर बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे.नेमके काय योग्य व काय अयोग्य आहे,कोणत्या दृश्याला कात्री लावावी याची
निश्चित नियमावलीच नसल्याने सेंसॉर बोर्डाने काही दृश्यांना कात्री लावण्याचा आदेश
दिला किंवा ‘अ’ प्रमाणपत्र चित्रपटाला दिले की प्रकरण न्यायालयात जाते.तिथे संबंधीत दृश्य हे
कथेची गरज म्हणून असणे कसे आवश्यक आहे हे न्यायालयाला पटवून देण्यात दिग्दर्शक
यशस्वी होतात आणि सेंसॉर बोर्ड हारते.
तरीही जर आपण आपल्या कर्तव्याचा योग्य वापर केला
तर सामान्य जनतेत जागरुकता,ज्ञान यांचा प्रसार चित्रपटांच्या माध्यमातून यथोचीत होवू शकतो.आपले हे
कर्तव्य आहे की,समाजात जनजागृती करण्यासाठी,जीवनाच्या प्रती योग्य दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी या चित्रपट माध्यमाचा आपण
योग्य उपयोग करू.
-सुरेश मंत्री,धारुर

Thanks
उत्तर द्याहटवा